सर्व क्लबचे पदाधिकारी व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या वतीने शहरात रविवारी (दि.22 मे) स्नेहबंध या विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी येथील जिमखाना येथे दुपारी 4 ते रात्री 9 वाजे पर्यंत ही परिषद होणार असून, या परिषदेत विभागातील सर्व क्लबचे पदाधिकारी व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्सचे प्रदेश अध्यक्ष संतोष माणकेश्वर यांनी केले आहे.
लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. लायन्स क्लबचे संपूर्ण जगात 14 लाख सदस्य असून, 50 हजार क्लब कार्यरत आहे. यावर्षी अहमदनगर विभागाने थिंक ग्लोबल बट रिअॅक्ट लोकल या थिमवर कार्य केले आहे. लायन्स इंटरनॅशनल, लायन्स एरिया फोरम, मल्टिपल डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सामाजिक कार्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे थीम देत असतात. या थीमला अनुसरून अहमदनगर विभागातील सर्व क्लबने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सामाजिक योगदान देताना देशपातळीवर घडत असलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून व स्थानिक ठिकाणच्या समाजाची गरज ओळखून समाजसेवेचे कार्य सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संतोष माणकेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या विभागीय परिषदेत शिर्डी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, पाथर्डी, राहुरी अशा विविध ठिकाणचे 16 क्लबचे पदाधिकारी केलेल्या कार्याचा आढावा सादर करणार आहेत.