सोलापूर विभागीय रेल्वे मॅनेजर गुप्ता यांचे आश्वासन
गुप्ता यांची भेट घेऊन वधवा यांनी मांडले अहमदनगर रेल्वेचे विविध प्रश्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील रेल्वे स्थानकावर सोलापूर विभागीय रेल्वे मॅनेजर शैलेश गुप्ता आले असता, त्यांची सोलापूर विभागीय रेल्वे सलागार समितीचे सदस्य हरजितसिंह वधवा यांनी भेट घेतली. यावेळी गुप्ता यांच्याकडे अहमदनगर-पुणे इंटरसिटी व आष्टी-नगर-पुणे-मुंबई रेल्वे सुरु करण्याची मागणी करुन व इतर प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अशोक कानडे, संदेश रपारिया उपस्थित होते. विभागीय रेल्वे मॅनेजर गुप्ता यांनी लवकरच अहमदनगर-पुणे इंटरसिटी सुरु होणार असल्याचे आश्वासन दिले.
अहमदनगर रेल्वे स्थानक हे जंक्शन होण्याच्या दृष्टीकोनाने प्लॅटफॉर्म नं. 3 आणि प्लॅटफॉर्म न. 4 लवकर तयार करण्याची मागणी वधवा यांनी केली. तर पुणे-लखनऊ 11037/11038 आणि पुणे-गोरखपूर 12103/12104 ला अहमदनगरला थांबा देण्याची व रेल्वे मध्ये अनधिकृत हॉकर्स यांना प्रतिबंध घालण्याची मागणी देखील केली. यावर शर्मा यांनी सदर प्रश्न वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देऊन, अनधिकृत हॉकर्सना पायबंद करण्याचे तात्काळ आदेश कोतवाल यांना दिले. प्रवासी संघटनेच्या वतीने गुप्ता यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य अधिकारी प्रदीप हिरडे, स्टेशन मॅनेजर एन.पी. तोमर, नगरचे वाणिज्य अधिकारी आर.एस. मीना, तिकीट इन्स्पेक्टर एच. आर. कुलथे, एच.एस मीना, पो.नि. कोतवाल आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.