ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी
रोटरी इंटेग्रिटीच्या स्थापना दिनाचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक योगदान देणार्या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीच्या स्थापनादिनानिमित्त जेऊर येथील बहिरवाडी (ता. नगर) येथे ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी करुन वाडी-वस्तीवरील शालेय विद्यार्थ्यांना शाळेसाठी शूज देण्यात आले.
रोटरी इंटेग्रिटीचा तिसरा वर्धापनदिन सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असून, या पार्श्वभूमीवर उपक्रम राबविण्यात आला. खंडेलवाल आय हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामस्थांची नेत्र तपासणी करुन त्यांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करण्यात आले. सरपंच अंजनाताई येवले यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प अर्ज भरुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी उपसरपंच मधुकर पाटोले, रोटरी इंटेग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर, प्रकल्प प्रमुख शुभश्री पटनायक, रवि डिक्रूज, चंदना गांधी, निखिल कुलकर्णी, नचिकेत रसाळ आदी उपस्थित होते.
रोटरी इंटेग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर म्हणाले की, रोटरी समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचून त्यांना आधार देण्याचे कार्य केले जात आहे. वंचित घटकांची खरी गरज ओळखून त्यांच्या पर्यंत मदत पोहचविण्यात येत आहे. समाजातील गरीब-श्रीमंताची दरी दूर करण्याचे कार्य रोटरी आपल्या सामाजिक योगदानातून करत असल्याचे त्यांनी सांगितले. निखिल कुलकर्णी यांनी एका व्यक्तीच्या मरणोत्तर नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमान होत असते. भारतात गैरसमजुतीमुळे नागरिक नेत्रदान करण्यास पुढे येत नसून, यासाठी जागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर नेत्रदानाचे महत्त्व व गरज विशद केले. या शिबीरात पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला. डॉ. शिल्पा खंडेलवाल यांनी ग्रामस्थांची नेत्र तपासणी केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 95 विद्यार्थ्यांना शालेय शूज वाटण्यात आले.