आदर्श गाव म्हणून जिल्ह्याच्या नकाशावर येणार
श्रीगोंदा (प्रतिनिधी)- गावकर्यांच्या निर्णायक भूमिकेमुळे रुईखेल (ता. श्रीगोंदा) विकासात्मक वाटचाल सुरु असून, लवकरच आदर्श गाव म्हणून हे जिल्ह्याच्या नकाशावर येणार आहे. गावातील प्रत्येक वस्त्यांपर्यंत सिंगल फेज वीज जोड, अंतर्गत सिमेंट रस्ते, दुतर्फा वृक्षलागवड, ग्रामदैवत मंदिराच्या परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवून परिसर सुशोभित करण्यात आलेला आहे. तर ग्रामपंचायतची उभारण्यात आलेली भव्य इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रुईखेल गावाची लोकसंख्या कमी असली तरी, विकासाचे व्हिजन घेऊन सुंदरदास नागवडे व श्रीगोंदा मार्केट कमिटीचे चेअरमन संजयकाका महांडुळे यांच्या नेतृत्वाखाली गावाचा झपाट्याने बदल झाला आहे. गावात अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आले आहेत. सरपंच, उपसरपंच व सर्व पदाधिकारी यांच्या एकविचाराने विकास कामे सुरू असून, ग्रामसेवक बी.के. मिसाळ यांचा शासनाकडे पाठपुरावा असतो. गावात सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करुन जिल्हा परिषद शाळेचा परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आलेला आहे. तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. त्याचप्रमाणे गावाचे शंभर टक्के लसीकरण झाले असल्याचा दावा सरपंच मिना मदने यांनी केला आहे.
गावात पंचायत समिती अंतर्गत महिला बचत गट स्थापन करून, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचे कार्य सुरु आहे. ग्रामपंच्यातच्या नवीन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना एक वर्ष पुर्ण झाले असून, उर्वरीत पाच वर्षात गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. चांगली मानसिकता असेल तर गावाचा विकास शक्य आहे. विरोधकांना मात्र हा विकासडोळ्यात खुपत आहे. गावात काम करताना राजकारण बाजूला सारुन ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा व त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य अविरतपणे सुरु राहणार असल्याचेही सरपंच मदने यांनी म्हंटले आहे. गावाच्या विकासासाठी सुभाषतात्या काळोखे, भरत गोसावी, झुंबर महांडुळे, विश्वनाथ गायकवाड, सुजाता गुंजाळ, वंदना तरटे, साईपुजा तरटे, तान्हाजी बोबडे, सविता महांडुळे, अरुण तरटे, शिपाई कानिफ ठोंबरे यांचे सहकार्य लाभत आहे.