• Wed. Dec 11th, 2024

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 30 वर्षापुर्वीचा जमिनीची ताबा आणि मालकीचा वाद मिटला

ByMirror

Mar 12, 2022

ताबा त्याला मालकी देण्याचा झाला निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि.12 मार्च) झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 30 वर्षापुर्वीचा पाथर्डी येथील जमीनीचा वाद सामजस्यांने सोडवून, ताबा त्याला मालकी देण्यात आली. अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना न्याय मिळाला असून, राष्ट्रीय लोक अदालत खर्‍या अर्थाने न्याय करणारे उन्नतचेतनेचे लोक अदालत ठरले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी व अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे यांनी दिली.
पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथील गट नंबर 175, 176 मध्ये गेली तीस वर्षे ताबा आणि मालकीच्या संदर्भातील वाद संपविण्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर यांनी पॅनल 19 वरील न्यायाधीश श्रीमती ए.ले. मांडवगडे, अ‍ॅड. रावसाहेब बर्डे, अ‍ॅड. चैताली खिल्लारी यांना मार्गदर्शन करुन हा वाद कायमचा संपवला.
शंकरवाडी (ता. पाथर्डी) येथील गट नंबर 175 मधील 5 हेक्टर 89 आर ही जमीन संपत रंगनाथ झाडे, रावसाहेब एकनाथ झाडे, नवनाथ विश्‍वनाथ चिमटे यांनी सन 1991 चे अगोदर नोंदवलेल्या खरेदी खताने विकत घेतली होती. परंतु त्यांनी शंकरवाडी येथील गट नंबर 176 मधील 5 हेक्टर 43 आर मध्ये गेली तीस वर्षे ताबा ठेऊन मेहनत, मशागत चालू ठेवली. त्या ठिकाणी त्यांनी घरे, गोठे बांधले तरी शंकरवाडी येथील गट नंबर 176 मधील 5 हेक्टर 43 आर जमीन दगडू भानुदास महाडिक यांच्या कुटुंबाने 1991 साली खरेदी केली. परंतु याच गावच्या गट नंबर 175 मधील क्षेत्र 5 हेक्टर 89 आर मध्ये त्यांचा ताबा आजपर्यंत राहिला. एकंदरीत मालकी एक जमिनीची आणि ताबा दुसर्‍या जमिनीत त्यामुळे गेली तीस वर्षे दोन गटातील शेतकर्‍यांमध्ये वाद सुरू होता. परंतु हा वाद प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनामुळे निकाली निघाला असल्याचे म्हंटले आहे.

दिवाणी न्यायालयामध्ये तांत्रिक बाबींना फार महत्त्व दिले जाते. न्यायासाठी रडत येणार्‍या पक्षकारांना परत रडतच जावे लागते. खरा न्याय होण्याऐवजी कागदी हुकूमनामा त्यांच्या पदरात पडतो. परंतु प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लगड्डा यांनी लोक न्यायालयाचा व्यापक उद्देश आणि उन्नत चेतनेमुळे तांत्रिक बाबी दूर करून न्याय करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे गेल्या तीस वर्षाचा जमिनीचा ताबा आणि वाद मधील प्रतिदावा प्रकरण कायमचा मार्गी लावला आहे. दगडू भानुदास महाडिक यांच्यातर्फे अ‍ॅड. कारभारी गवळी, तर संपत रंगनाथ झाडे वगैरे तर्फे अ‍ॅड. लक्ष्मणराव पोकळे यांनी काम पाहिले.

राष्ट्रीय लोक अदालत खर्‍या अर्थाने न्याय करणारे उन्नतचेतनेचे लोक अदालत असल्याचे अहमदनगरच्या राष्ट्रीय लोक अदालतमुळे निष्पन्न झाले. जमिनीचा ताबा आणि मालकीच्या वादातून गट नंबर 187 च्या बांधावरुन जाणारा रस्ता काही शेतकर्‍यांनी अडवून ठेवला आहे. तो वाद सोडविणे आता सोपे झाले आहे. -अ‍ॅड. कारभारी गवळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *