पुरोगामी महाराष्ट्राचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रचला -आ. संग्राम जगताप
शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक समतेची ज्योत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रज्वलीत केली. त्यांनी जातीय विषमता नष्ट करुन, सर्वांना समान संधी उपलब्ध करुन दिली. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करुन करुन दुर्बल घटकांना त्यांनी सर्वप्रथम आरक्षण दिले. पुरोगामी महाराष्ट्राचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रचला. शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेतल्यास सामाजिक परिवर्तन घडणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त राष्ट्रवादी भवनमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, उपाध्यक्ष अमोल कांडेकर, सरचिटणीस गणेश बोरुडे, अजय दिघे, अमोल बोरुडे, लहू कराळे, डॉ. बाबासाहेब कडूस, प्रसाद कर्डिले, विशाल म्हस्के, सद्दाम शेख, अरबाज शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शिवव्याख्याती प्रणाली कडूस या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास आपल्या भाषणातून मांडला. प्रा. माणिक विधाते म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांचे सर्व क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन प्रत्येकाच्या मनात समता, बंधुता खर्या अर्थाने त्यांनी रुजवली. समाजाच्या प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे ते रयतेचे राजे होते. देशामध्ये सामाजिक परिवर्तन घडविणार्या व्यक्तींमध्ये शाहू महाराजांचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. 28 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना समान न्याय मिळावा म्हणून दूरदृष्टीने केलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
शाहू महाराजांच्या स्मृतीदिनाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन यावेळी करण्यात आले.