गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी रामवाडी नागरी सुविधा कृती समितीचा सामाजिक उपक्रम
कुटुंबाची हलाखीची परिस्थिती शिक्षणाने दूर होणार -मुदस्सर शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथील स्नेहालय संचलित बालभवनात शिकणार्या गरजू विद्यार्थ्यांना रामवाडी नागरी सुविधा कृती समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सतीश साळवे, दीपक सरोदे, संकेत लोखंडे, अश्विन खुडे, दिपक साबळे, अमोल लोखंडे, किशोर फुलारे, किशन गायकवाड, बाल भवनातील शिक्षक व सहकारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रकाश वाघमारे म्हणाले की, रामवाडी परिसरातील झोपडपट्टीत राहणारे विद्यार्थी बालभवनात शिक्षण घेत आहेत. कोरोनानंतर निर्माण झालेली आर्थिक प्रश्न, अनेकांचा हिरावलेला रोजगार तर वाढती महागाईमुळे आर्थिक दुर्बल घटक असलेल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही गरज ओळखून रामवाडी नागरी सुविधा कृती समितीच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक मुदस्सर शेख म्हणाले की, आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी प्रोत्साहन व मदत देण्याची गरज आहे. शिक्षणाने कुटुंबाचा व समाजाचा विकास साधला जाणार आहे. फक्त नोकरीसाठी शिक्षण नसून, शिक्षणाने परिपुर्ण मनुष्य घडतो. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती शिक्षणाने दूर होणार असून, दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी सर्वपरीने सहकार्य करणार आल्याचे त्यांनी सांगितले. बालभवनातील मुलांना विविध शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.