राज्यपालांना निरोपाचे नारळ देण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आग्रही
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वादग्रस्त वक्तव्य करुन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शेंडी शेंदूर काव्याला साथ देत, देशात दुही निर्माण करुन उन्नत शिवचेतनेपासून लांब असल्याचे सिध्द केले असल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संघटनेने डिच्चू कावा जारी केला असून, त्यांना निरोपाचे नारळ देण्यासाठी डिच्चू कावा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा, या तंत्राचा वापर केला. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात फोडा आणि राज्य करा तंत्राला शेंडी शेंदूर काव्याची साथ देऊन देशांमध्ये धर्माधर्मात दुही निर्माण करण्याचे काम सुरु आहे. उन्नत शिवचेतनेपासून लांब असलेल्या पक्षाने देशात सत्ता मिळवली. शेंडी शेंदूर काव्याचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विचारले नसते? असे चुकीचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीला जवळ केले नाही, किंवा कोणत्याही धर्माचा तिरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी, आपल्या आदर्श राज्याने गेल्या दोन हजार वर्षांत सर्वोत्कृष्ट प्रशासक असल्याचा इतिहास निर्माण केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. अशा वेळेस राज्यपालांनी आपले घटनात्मक सत्तेचे भान विसरून महाराजांबद्दल जे उद्गार काढले, त्याचा निषेध नोंदवून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाने त्यांच्या विरोधात डिच्चू कावा जारी केला असल्याचे संघटनेचे महासचिव अशोक सब्बन यांनी म्हंटले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी संघाच्या शाखेत इतिहासची तोडमोड करून घेतलेले धडे तमाम जनतेसमोर उघड केल्यामुळे शेंडी शेंदूर कावा देशाच्या धर्मनिरपेक्षतेला धोका ठरत आहे. भारतीय संविधानातील तत्त्वांशी त्यांचे वक्तव्य व वागणे पूर्णपणे विसंगत असल्यामुळे त्यांच्याकडे उन्नत शिवचेतना नसल्याचे स्पष्ट रीतीने प्रदर्शित केले असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. राज्यपालांच्या विरोधात डिच्चू कावा मोहिमेसाठी अॅड. गवळी, सुधीर भद्रे, कैलास पठारे, वीरबहादुर प्रजापती, महेबूब सय्यद, अशोक डाके, जयवंतसिंग परदेशी, अर्शद शेख, पोपटराव साठे, बबलू खोसला, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब पालवे, सुनिल टाक, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.