गुट्टलबाज सत्तापेंढारी विरोधात ऑपरेशन पर्याय व डिच्चू कावा तंत्र राबविण्याचे आवाहन
जनतेला लोककल्याणकारी राज्याची अपेक्षा असून, धर्मांध नेत्यांची नव्हे -अॅड. गवळी
अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय हितासाठी अजान व हनुमान चाळीसाचा वापर करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शुल्लक कारणावरुन दोन समाजातील वाद विकोपाला चालले असून, गुट्टलबाज सत्तापेंढारी धर्मा-धर्मात तेढ निर्माण करत आहे. राजकीय हित साधण्यासाठी धर्मा-धर्मात भांडण लावणारे राजकीय पुढारी व पक्षाच्या विरोधात ऑपरेशन पर्याय व डिच्चू कावा राबविण्याचे आवाहन पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
समाजाचे कोणतेही कामं न करता, युवकांचे माथे भडकविण्यासाठी प्रक्षोभक भाषणे केली जात आहेत. महाराष्ट्रात सत्ताधारी व विरोधक दोन्ही जातीयवादाला खतपाणी घालत आहे. प्रक्षोभक भाषणे करणार्यांना मोकळीक देऊन एकप्रकारे हा वाद चिघळविण्याच्या तयारीत राजकीय मंडळी आहेत. गुट्टलबाज सत्तापेंढार्यांचे जातीचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. आम आदमी पार्टीने दिल्ली व पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणताना जातीयवादी राजकारणाला थारा दिला नाही. यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला महाराष्ट्रात फार मोठी संधी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात एकाबाजूला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस तर दुसर्या बाजूला भाजप आणि मनसे लढत आहे. ही लढाई फक्त सत्ता मिळवण्यासाठी असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
आम आदमी पक्षाने सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर काम करुन विकास हा एकमेव अजेंडा ठेऊन सरकार चालवले आहे. दिल्ली, पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा बदल नक्की होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा डिच्चू कावा हा कानमंत्र घेऊन जनतेने पर्याय देण्याची गरज आहे. महाराजांनी स्वराज्याशी दगाफटका करण्याचा प्रयत्न करणार्यांच्या विरोधात डिच्चू कावा तंत्र राबविले. हे तंत्र जनतेने राबविण्याची गरज आहे. जनतेला लोककल्याणकारी राज्याची अपेक्षा असून, धर्मांध नेत्यांची नव्हे. अनेक सामाजिक विषय व प्रश्न असताना राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्रात हनुमान चाळीसा विरोधात अजानचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. ठाकरे सरकारचीही विकासाच्या नावाने बोंब असून, दोन वर्ष कोरोना काळात घरात बसून गेले. उर्वरीत काळावधी जातीच्या राजकारणात जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सरकारला घरकुल वंचितांचा प्रश्न सोडविता आलेला नाही. फुकटची सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्याचा भाग म्हणून राजकीय मंडळी समाजात वावरत आहेत. टोल नाक्याच्या संदर्भामध्ये वाद निर्माण करायचा आणि पुढे जाऊन तडजोड करून गप्प बसायचं, अशा लोकांकडून काही होण्याची शक्यता राहिलेली नसल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. गुट्टलबाज सत्तापेंढारींच्या विरोधातील मोहिमेसाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.