अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेतील माजी प्राचार्या काशिबाई भाऊसाहेब कांजवणे यांचे अल्पशः आजाराने नुकतेच निधन झाले. त्या 61 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नाती असा परिवार आहे.
वडझिरे (ता. पारनेर) गावातील शास्त्र विषयातील प्रथम पदवीधर होऊन काशिबाई 1984 साली रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्या. त्यांनी शिक्षिका, पर्यवेक्षिका, उपप्राचार्य व प्राचार्य अशी महत्वाची पदे भूषविली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन रयत शिक्षण संस्थेने 2017 मध्ये उत्तर विभागातील सर्वोत्तम प्राचार्या म्हणून सावित्रीबाई फुले पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.
प्राचार्य पदावर काम करत असताना पारनेर तालुक्यातील जवळा आणि वडझिरे पंचक्रोशीत त्यांच्या कामाचा आणि शिस्तप्रियतेचा दबदबा होता. गणित व विज्ञान विषयात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले व गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत दिली. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.