मुख्यमंत्री, अर्थमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रमजान ईदपुर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे एप्रिलचे नियमीत वेतन तसेच फेब्रुवारी आणि मार्चचे थकित वेतन अदा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
2 मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी असून, 3 मे रोजी रमजान ईद आहे. अनेक शिक्षकांनी ईद सणानिमित्ताने व बाहेरगावी जाण्यासाठी आरक्षण केल्याप्रमाणे एप्रिलचे वेतन 2 मे पर्यंत होणे आवश्यक आहे. बीडीएस प्रणाली बंद झाल्यामुळे फेब्रुवारीचे अनेक शाळांचे वेतन अडकून पडले आहे. याबाबत ऑफलाइन पद्धतीने तात्काळ वेतन अदा करण्याची सूचना द्यावी तसेच सर्व प्रकारचे थकीत बिले, मेडिकल बिले, भविष्य निर्वाह निधी रक्कम तात्काळ अदा करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अनेक जिल्ह्यात आजपर्यंत मार्च वेतनही मिळाले नसल्याने शिक्षक-शिक्षकेतर संतप्त आहेत. मागील दोन वर्षापासून विविध विभागाकडून वेतन अनुदान वेळेवर न आल्याने तसेच अन्य प्रशासकीय कारणांमुळे शिक्षक-शिक्षकेतर यांचे वेतन वेळेवर होत नाही. याबाबत तात्काळ दखल घेऊन एप्रिलचे नियमीत वेतन तसेच फेब्रुवारी आणि मार्चचे थकित वेतन अदा करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, शिक्षक आमदार गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवानअप्पा साळुंखे, सुमन हिरे, प्रा.सुनिल पंडित आदी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.