जायंट्स ग्रुप, केमिस्ट असोसिएशन व जनकल्याण रक्तपेढीच्या संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्तीने प्रेरित होऊन युवकांनी सामाजिक योगदान देण्याची गरज आहे. सामाजिक योगदान ही देशसेवाच असून, तरुण पिढीच्या रक्ताच्या थेंबा थेंबात देशभक्ती जागृत करण्यासाठी जायंट्सच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संजय गुगळे यांनी केले.
तीन वर्षापुर्वी पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना जायंट्स ग्रुप, केमिस्ट असोसिएशन व जनकल्याण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेऊन श्रध्दांजली वाहण्यात आली. भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारतीय नौसेनेचे माजी कमांडर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जनकल्याण रक्तपेढीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमोद सोळंकी, जायंट्सच्या अध्यक्षा विद्या तन्वर, डॉ. म्हडीकर अशोक बलदोटा, राजेंद्र बलदोटा, राजेंद्र बेद्रे, सुधाकर बोरुडे, मिलिंद क्षीरसागर, कुलकर्णी, मिरगणे, हरिभाऊ डोळसे, अनिल गांधी, नितीन गांधी, नूतन गुगळे, भावना गुगळे, आनिकेत कौर, आदित्य चांदेकर, सचिन राऊत, सतीश इंदानी, सुधीर लांडगे, सागर उंडे, शरद बळे, पारनेरकर, धर्मेंद्र सावनेर आदी उपस्थित होते.
माजी कमांडर राहुल जाधव म्हणाले की, सोशल मिडीयाच्या युगात फक्त मोबाईलवर श्रध्दांजली न वाहता प्रत्यक्षपणे सामाजिक उपक्रम घेऊन शहीद जवानांना वाहिलेली श्रध्दांजलीने स्वत: माजी सैनिक असल्याचे अभिमान वाटत आहे. सुख, संसार, कुटुंब व समाज सोडून जवान सिमेवर देश रक्षणाचे कर्तव्य बजावत असतो. त्याला वीरमरण आल्यास जेंव्हा सर्वसामान्य नागरिक त्यांच्याप्रति आदर व्यक्त करतात, तेंव्हा त्या कुटुंबाला अभिमान वाटत असतो. देश रक्षणाचे कर्तव्य बजावणारे सैनिक देशाची शान असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमोद सोळंकी यांनी भारतमातेचे पुत्र असल्याचे अभिमान असून, प्रत्येक नागरिकांनी आजी-माजी सैनिकांप्रती कृतज्ञ राहण्याचे सांगितले. विद्या तन्वर यांनी हॅलेंटाईनच्या दिवशी आमचे प्रेम व गुलाब पुष्प शहीद जवानांना समर्पित असल्याचे सांगितले. डॉ. म्हडीकर यांनी रक्तदानाने इतरांचे जीव वाचत असते, यासाठी युवकांनी देशसेवा म्हणून रक्तदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.