पक्षात काम न केल्याने खोटे गुन्हे दाखल करणे, जीवे मारण्याची धमकी देऊन तो पदाधिकारी लग्न मोडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप
अन्यथा आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही -गजेंद्र सैंदर
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखाकडून जीवितास धोका असल्याची तक्रार हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते गजेंद्र सैंदर यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. युवा सेनेचा जिल्हाप्रमुख त्याच्या पक्षात काम करत नसल्याचा राग मनात धरुन खोटे गुन्हे दाखल करण्यास धमकावत असून, काही दिवासांवर असलेले लग्न देखील मोडण्याच्या तयारीत आहे. श्रीराम नवमीच्या मिरवणुकीमध्ये त्याने खोटा गुन्हा दाखल करुन त्रास देण्यास सुरुवात केली आहे. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यापासून आजपर्यंत तीन ते चार वेळा अनोळखी व्यक्तींमार्फत मला व कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली असल्याचे पत्रकार परिषदेत सैंदर यांनी सांगितले.
गजेंद्र सैंदर यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मी 2015-16 पासून हिंदूराष्ट्र सेनेचे सामाजिक कार्य करत आहे. शहरातील युवा सेनेचा जिल्हाप्रमुखाबरोबर ओळख झाल्याने त्याने मित्रांना शिवसेना पक्षात प्रवेश करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे सांगितले. माझ्या मित्रांनी त्यासाठी नकार दिल्याने त्यावेळी माझी व माझ्या मित्रांची त्याच्याबरोबर बाचाबाची झाली. त्यावेळी त्याने आमदारांचा मुलगा असून, आमचे काम करत नसल्याने धमकावण्यास सुरुवात केली. सदर पदाधिकार्याचा राजकीय वारसा असल्याने आमच्या तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही.
10 एप्रिल रोजी श्रीराम नवमीच्या मिरवणुकीमध्ये त्या युवा सेनेच्या पदाधिकारी, माजी महापौर (सध्या शिवसेनेत कार्यरत) व त्यांच्या साथीदारांनी जीवे मारण्याची धमकी दिली. 12 एप्रिल 2022 रोजी वडील प्रकाश सैंदर यांनी पोलीस अधीक्षकांना माझ्या जीविताला धोका असल्याबाबात अर्ज केला होता. मिरवणुकीत शस्त्र दाखवून धमकावल्याप्रकरणी माझ्यावर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे सदर पदाधिकारी व त्याच्या साथीदारांकडून मला व माझ्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. 20 मे रोजी शहरातील एका लॉनमध्ये माझे लग्न असून, हे लग्न मोडण्यासाठी युवा सेनेचा जिल्हाप्रमुखाने लग्नाअगोदर अनेक गुन्हे दाखल करणार असल्याचे धमकावले आहे. माझे लग्न न झाल्यास माझी व कुटुंबाची समाजात बदनामी होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
माझे आयुष्य उध्वस्त करण्याच्या मार्गावर तो युवा सेनेचा पदाधिकारी असून, त्याच्याकडून मला व माझ्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सदर युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखावर कारवाई करावी. कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी गजेंद्र सैंदर यांनी केली आहे. अन्यथा आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.