• Wed. Dec 11th, 2024

युवक-युवतींचे तणावपुर्ण जीवनशैलीमुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात -संगीता चंद्रन

ByMirror

Aug 12, 2022

रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथचा माइंडस्ट्राँग इमोशनल हेल्थ फर्स्ट एडर प्रोग्राम

सीएसआरडी महाविद्यालयातील युवकांना मार्गदर्शन

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील युवक-युवतींचे तणावपुर्ण जीवनशैलीमुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. बेरोजगारी, शिक्षण व करिअरची चिंता, कौटुंबिक वाद, व्यसन व आर्थिक प्रश्‍न या सर्व गोष्टींचा परिणाम युवकांच्या जीवनावर होत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय युवक मानसिक आजाराकडे झोकला जात आहे. जीवनात नैराश्य आल्याने मोठ्या संख्येने युवक आत्महत्येचा पत्कारत असल्याचे प्रतिपादन टाटा कन्सल्टन्सीच्या सर्व्हिसेसच्या ग्लोबल हेड संगीता चंद्रन यांनी केले. शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणे आवश्यक असून, याबद्दल समाजात जागृती व योग्य मार्गदर्शन होण्याची गरज असल्याची भूमिका त्यांनी मांडली. तर रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथचा उपक्रम दिशादर्शक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथच्या वतीने माइंडस्ट्राँग इमोशनल हेल्थ फर्स्ट एडर (साथी) प्रोग्राम अंतर्गत सीएसआरडी महाविद्यालयातील युवक-युवतींना सकारात्मक मानसिक आरोग्यासह सक्षम बनविण्यासाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात चंद्रन बोलत होत्या. यावेळी क्लबच्या अध्यक्षा नंदिनी जग्गी, संस्थापिका डॉ. बिंदू शिरसाठ, कोषाध्यक्ष जागृती ओबेरॉय, सचिव सविता चढ्ढा, सहाय्यक प्राध्यापक असावरी झपके, चारुता शिवकुमार, शीलू मक्कर, कविता कथडे आदी उपस्थित होते.


पुढे चंद्रन म्हणाल्या की, जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या आनंदी असतो, तेव्हा आपण आपल्या वातावरणात लोकांसह आनंदी राहायला शिकतो. तसेच आपण वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा सामना करताना आत्मविश्‍वास निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. बिंदू शिरसाठ यांनी रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ हा एक युवकांच्या प्रश्‍नावर कार्य करणारा क्लब आहे. ज्यामध्ये विविध देश आणि शहरांमधील सदस्य आहेत. क्लबच्या माध्यमातून तरुणांना मानसिक रित्या सक्षम बनवण्यासाठी प्रोजेक्ट माइंडस्ट्राँग इमोशनल हेल्थ फर्स्ट एडर (साथी) प्रोग्रामचे अनावरण करण्यात आले आहे. हा एक सामुदायिक सहाय्य उपक्रम असून, ज्यात युवकांचा स्वयंसेवक म्हणून समावेश होतो. समाजकार्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करुन घेऊन सकारात्मक मानसिक आरोग्याचा प्रचार-प्रसार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नंदिनी जग्गी म्हणाल्या की, साथी हा कार्यक्रम स्वयंसेवकांना मानसिक आरोग्याविषयी तपशील समजण्यास मदत करण्यासाठी, ते राहत असलेल्या समुदायातील मानसिक आरोग्याच्या घसरणीची चेतावणी चिन्हे ओळखण्यासाठी, ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना प्रथम स्तरावर आधार देण्यासाठी साधने जाणून घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ प्रोजेक्ट माइंड स्ट्राँग तीन टप्प्यांमध्ये काम करणार आहे. जो लवचिकता आणि अनुकूलता सुधारण्यासाठी स्वयं-विकासात्मक कार्यक्रम आहे. युवा स्वयंसेवक तयार करून समुदाय समर्थन कार्यक्रम, ग्राफोथेरपी आणि हेल्पलाइन सहाय्य यांसारखे थेरपी कार्यक्रम, माइंडस्ट्राँग अ‍ॅम्बेसेडर प्रोग्राम ज्यामध्ये तरुण यश मिळवणार असल्याचे स्पष्ट केले.


सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांनी रोटरीने युवकांची गरज ओळखून राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. साथी उपक्रम यशस्वी करण्यासाठी सातारा येथील डॉ.अपर्णा भाकरे, ठाणे येथील आरती म्हात्रे, पुणे येथील सई संत प्रयत्नशील आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *