निमंत्रण पत्रिका सोशल मिडीयात व्हायरल
तीन वर्षापुर्वी मंजूर असलेला रस्त्याचे काम अद्यापि अपुर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील खड्डेमय व धुळीने माखलेल्या रस्त्यांनी नागरिक वैतागलेले असताना, सोशल मिडीयावर शहरात युक्रेनमधील रस्त्याच्या खड्ड्यांचा देखाव्याच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे. सामाजिक कार्यकर्ते ऋषीकेश गुंडला यांनी तोफखाना भागातील रस्त्याची दुरावस्था युध्दजन्य परिस्थितीने युक्रेनच्या रस्त्यांसारखी झाली असल्याचा आरोप केला आहे. तर सदर रस्त्यांचे काम मार्गी लावण्याचे निवेदन गुंडला यांनी महापालिका आयुक्त, शहर अभियंता सुरेश इथापे, संजय पवार, महापौर रहिणीताई शेंडगे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता संजय पवार यांना दिले.
तोफखाना भागातील संबोधी हायस्कूल सुराणा बिल्डिंग ते महेसुनी टेलर शितलादेवी पर्यंतचा रस्ता 2019 साली मंजूर झाला. तीन वर्षापुर्वी मंजूर झालेल्या रस्त्याचे तीनते चार महिन्यापुर्वी काम सुरु करुन अर्धवट सोडून देण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांना महापालिकेचे सर्व कर भरुन देखील नागरी सुविधा मिळत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
प्रलंबीत काम होत नसल्याने नागरिकांनी चक्क युक्रेनच्या धर्तीवर खड्डेमय रस्त्याचा देखावा साकारण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. देखाव्याचे आयोजक म्हणून तोफखाना भागातील पाठ, कंबर दुखणारे नागरिक तर उद्घाटक म्हणून आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असा निमंत्रण पत्रिकेतील उल्लेख सर्वांचे लक्ष वेधत आहे.