धार्मिक एकता व सामाजिक सौदार्यचे दर्शन
चितपट कुस्त्यांनी गाजला हगामा
अहमदनगर(प्रतिनिधी)- राज्यात एकीकडे सुरु असलेला भोंग्यावरुन राजकारण व त्यातून निर्माण होत असलेला जातीय तणाव, तर निमगाव वाघात (ता. नगर) ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांची यात्रा व करिम शहा वली बाबांचा संदल ऊरुस गावातील सर्व धर्मियांनी एकत्र साजरा करुन महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचे दर्शन घडविले. गावात यात्रा उत्सव व संदल उरुस उत्साहात साजरा करुन धार्मिक एकता व सामाजिक सौदार्हाचा संदेश देण्यात आला.
रविवारी ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांची यात्रा उत्साहात पार पडली. रात्री छबीना मिरवणुक काढण्यात येऊन, गावात आर्केस्ट्राचा कार्यक्रम रंगला होता. यात्रेच्या दुसर्या दिवशी सोमवारी भरविण्यात आलेला कुस्ती हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. महिला मल्लांनी देखील आपल्या कुस्त्यांच्या डावपेचांनी कुस्तीप्रेमींची वाहवाह मिळवली. एकशे एक रुपयापासून तर एकवीस हजार रुपया पर्यंन्त लावण्यात आलेल्या मल्लांच्या कुस्तीचा थरार रंगला होता. या निकाली कुस्त्यांनी ग्रामस्थांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तर हगाम्यात जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्ल सहभागी झाले होते. सकाळी गावात कलगी-तुराचा तर संध्याकाळी संदल-ऊरुसच्या मिरवणुकीने गावात गुण्या गोविंदाने यात्रोत्सव साजरा झाला.
कुस्ती हगाम्याच्या प्रारंभी आखाड्याचे पूजन करुन करण्यात आले. कुस्ती आखाड्यात उत्तम कुस्ती करणार्या मल्लांवर ग्रामस्थांनी रोख बक्षिसांचा वर्षाव केला. तसेच पराजित मल्लांना देखील प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले. शंभर रुपयापासून ते पंचवीस हजारा पर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या. शेवटची मानाची कुस्ती पै. वैभव फलके विरुध्द पै. संदिप डोंगरे यांच्यात 25 हजार रुपयाची कुस्ती लावण्यात आली. ही कुस्ती बरोबरीत सुटली. महिला कुस्तीपटूंनी देखील आखाड्यात हजेरी लावली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, नामदेव भुसारे, अरुण फलके, डॉ. विजय जाधव, साहेबराव बोडखे, भरत फलके, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव, पै.अनिल डोंगरे, पै.वसंत फलके, संजय कापसे, प्रमोद जाधव, अरुण कापसे, बाबा केदार, कोंडीभाऊ फलके, बबन शेळके, कादर शेख, अतुल फलके, दिलावर शेख, विकास निकम, मच्छिंद्र काळे, मच्छिंद्र कापसे, राजू शेख, सुखदेव जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दोन वर्ष कोरोनामुळे खंड पडलेल्या यात्रोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी हजर होते. यात्रा उत्सव व संदल उरुस यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.