हागणदारीमुक्त गाव करण्याची अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीची मागणी
अनुदान लाटण्यासाठी हागणदारीमुक्त गाव दाखविण्यात आल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे सावरगाव गावठाण अनुदान लाटण्यासाठी हागणदारीमुक्त दाखविण्यात आले असून, गावातील सर्वसामान्य शेतकरी हागणदारीने वैतागला असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. तर गाव हागणदारीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी निवेदन दिले.
पारनेर तालुक्यातील मौजे सावरगाव गावठाण हद्दीत गट नंबर 1व 72 खाजगी मालकी असलेल्या क्षेत्रांमध्ये हागणदारी मुक्त करणे बाबत स्थानिक शेतकर्यांनी वेळोवेळी तक्रार करुन पाठपुरावा केलेला आहे. मात्र ग्रामपंचायत कार्यालयाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली आहे. संबंधित शेतकर्यांना शेत जमीन कसण्यासाठी अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित शेतकर्यांना उपासमारीची वेळ आली आहे. सावरगाव ग्रामपंचायतीने यापूर्वी अनुदान हडपण्यासाठी हागणदारीमुक्त योजनेत गाव बसवले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सावरगावात हागणदारीमुक्त योजनेची चौकशी करुन, ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या सर्व शौचालय अनुदान वाटप योजनेची पाहणी करून चौकशी अहवाल तात्काळ कार्यालयास प्राप्त करुन द्यावा, दोषी असलेल्या अधिकार्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर 13 जून पासून स्थानिक शेतकर्यांसह उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.