महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाकाळात साजरा न करता आलेला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाळांचे ऑगस्ट महिन्याचे शिक्षक व शिक्षकेत्तरांचे वेतन 25 ऑगस्ट पूर्वी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
यावर्षी गणेशोत्सव 31 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हा सण आपल्या मूळ गावी जाऊन साजरा करतात. गणेशोत्सवाची पूर्वतयारी किमान आठ दिवस अगोदर पासून सुरू होते. मागील वर्षी कोरोनामुळे अनेकांना गणेशोत्सवासाठी गावी जाता आले नव्हते. तसेच कोरोनाच्या संकटानंतर अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अनेक प्रश्नांना शिक्षक, शिक्षकेत्तरांना सामोरे जावे लागत आहे. या सणाचा खर्चही मोठा असतो. यामुळे हा सण भक्तीभावाने व आनंदाने साजरा करता यावा यासाठी ऑगस्ट महिन्याचे वेतन 25 ऑगस्ट पूर्वी करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. या मागणीसाठी राज्यकार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.