अहिल्यादेवींचा सामाजिक वारसा प्रत्येकाने पुढे घेऊन गेल्यास पुरोगामी महाराष्ट्राला एक दिशा मिळणार -माधव गडदे
सामाजिक कार्य करणार्यांचा पुरस्काराने गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहिल्यादेवींचा सामाजिक वारसा प्रत्येकाने पुढे घेऊन गेल्यास पुरोगामी महाराष्ट्राला एक दिशा मिळणार आहे. ज्या काळात महिलांना समाजात स्थान नव्हते, अशा परिस्थितीमध्ये मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींच्या रुपाने नेतृत्व उभे केले. आपल्या घरातील माता-भगिनींना उंबरठ्याबाहेर घेऊन येऊन त्यांना प्रोत्साहन दिल्यास खर्या अर्थाने अहिल्यादेवींना अभिवादन ठरणार असल्याचे प्रतिपादन यशवंत सेनेचे राज्याध्यक्ष माधव गडदे यांनी केले.
यशवंत सेनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात सामाजिक कार्य करणार्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात गडदे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय तमनर, शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, राजेंद्र नजन, रत्ना पाटील, शर्मिला नलावडे, प्रा. डॉ. सुभाष अडावतकर, मुंबई शिवसेनेचे नंदकुमार जाधव, संजय बारहाते, नगरसेवक मनोज कोतकर, पै. नाना डोंगरे, प्रकाश इथापे, मुकेश दुधाडे, ज्ञानेश्वर कांबळे आदींसह समाजबांधव व महिला उपस्थित होत्या.
पुढे बोलताना गडदे म्हणाले की, सामाजिक कार्य करणार्यांनी अहिल्यादेवींचा त्याग व कार्य स्मरणात ठेवावे. मंदिरे बांधून हिंदू रक्षणाचे कार्य करणार्यांना अहिल्यादेवींनी घाट बांधले. तर आक्रमणाने पडलेल्या मस्जिदही बांधून सामाजिक विचार त्यांनी दिला. कल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख असून, महिलांनी त्यांचा आदर्श समोर ठेऊन चार भितींत न अडकता आपले गुणकौशल्याने आपले असतित्व निर्माण करण्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कांतीलाल जाडकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती त्यांच्या विचाराने समाजात कार्य करणार्यांचा गौरव करुन साजरी करण्यात आली. समाजात काम करणार्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य यशवंत सेना करीत आहे. कोरोनाच्या काळात संस्थेच्या वतीने सर्वसामान्यांना आधार देण्यात आले. माणसे जोडून समाजाचा विकास करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जीवनगौरव, युवा गौरव व समाजरत्न पुरस्कार देण्यात आले. पुरस्कारासाठी राज्यभरातून आलेल्या प्रस्तावामधून पुरस्कार्थींची निवड करण्यात आली होती.
जिल्हाध्यक्ष विजय तमनर म्हणाले की, अहिल्यादेवींचा त्याग स्मरणार्थ ठेवून समाजात योगदान देण्याची गरज आहे. कांतीलाल जाडकर दिव्यांग असूनही समाजात झोकून कार्य करत आहेत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन हा सामाजिक लढा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय बारहाते यांनी यशवंत सेनेचे कार्य समाजाला बळ देणारे आहे. जातीच्या पलीकडे जाऊन अहिल्यादेवींच्या कार्याची प्रेरणा घेऊन संघटनेचे कार्य सुरु असल्याचे सांगितले. रत्ना पाटील यांनी आपल्या जीवनाचा खडतर प्रवास मांडून संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या दिव्यांग मुलांच्या सेवेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी केले. आभार अजय जाडकर यांनी मानले.