मोबदला न मिळाल्यास महिलेचा आत्मदहन करण्याचा इशारा
पाईपलाईनसाठी शेतातील बांध फोडून, जेसीबीने खड्डे खोदून शेतीचे नुकसान केल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- इसळक (ता. नगर) येथील गट नंबर 1 मधील स्वत:च्या मालकीच्या शेतात तब्बल दोन गुंठे जागेत उभे खड्डे खोदून ऑइलची पाईपलाईन टाकली जात असल्याचा मोबदला मिळण्याची मागणी अशिक्षित विधवा महिलेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी कोणतीही पुर्वसूचना न देता शेतातील बांध फोडून जेसीबीने खड्डे करुन शेताचे नुकसान करण्यात आले असून, याप्रकरणी विचारणा केली असता इंडियन ऑइल कंपनीचा अधिकारी व दोन पोलीस कॉन्स्टेबलने शिवीगाळ केली असल्याचा आरोप तक्रारदार महिला शारदा मंजाबापू शिंदे यांनी केला आहे.
शारदा मंजाबापू शिंदे यांचे इसळकला गट नंबर 1 मध्ये शेत जमीन आहे. त्यांच्या शेतातून इंडियन ऑइल कंपनीची पाईपलाईन गेली आहे. सदरची पाईपलाइन टाकण्यासाठी दोन गुंठे मिळकतीत जेसीबीने खड्डे खोदण्यात आले आहे. याचा कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही. तर पाईपलाईन करण्यापूर्वी कोणतीही पूर्व सूचना देण्यात आलेली नव्हती.
काम सुरु झाल्यानंतर याप्रकरणी इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकार्यास जाब विचारल्यास सदर अधिकारी व त्याच्या सांगण्यावरुन दोन पोलीस कॉन्स्टेबलने शिवीगाळ करुन काम जबरदस्तीने काम सुरू केले. शेताचा संपूर्ण बांध फोडण्यात आला असून, शेतीचे अतोनात नुकसान करण्यात आले असल्याचे तक्रारदार महिलेने निवेदनात म्हंटले आहे.
महिला एकटी विधवा व अशिक्षित असल्याचे याचा गैरफायदा घेतला जात आहे. बांंधा शेजारी असलेल्या शेतकर्यास इंडियन ऑइल कंपनीने प्रति गुंठा चार लाख रुपये मोबदला दिलेला आहे. महिलेच्या शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले असून, तिला मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तरी याचा त्वरीत मोबदला देण्याची मागणी शारदा मंजाबापू शिंदे यांनी केली आहे. मोबदला न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सदर महिलेने दिला आहे.