शेळके बंधूंचा सामाजिक उपक्रम
गरजूंवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- आई, वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुलांनी गावात मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आणि रक्तदान शिबीराने सामाजिक उपक्रमांचा पायंडा पाडला. स्व. केरु पुंजाजी शेळके व स्व. गं.भा. नंदा केरु शेळके यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रूपेवाडी (घोडेगाव- मिरी रोड) शेळके वस्ती येथे (ता. पाथर्डी) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आई-वडिलांच्या संस्काराने प्रेरित होऊन शेळके बंधूंनी गावात राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. गावातील 15 गरजूंवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तर रक्तदान शिबीराला युवकांचा प्रतिसाद लाभून 52 रक्त पिशव्या संकलित करण्यात आले.
प्रहार जनशक्तीचे राज्य प्रवक्ते संतोष पवार व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ह.भ.प. तेजस्विनी नवले यांनी किर्तनातून सामाजिक संदेश दिला. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मेजर विनोद परदेशी यांनी इतरांना जीवदान देणारे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगितले. मालोजी शिकारे यांनी माता-पित्यांच्या उपकाराची परतफेड करणे अशक्य असल्याचे सुश्राव्य वाणीतून सांगितले. ह.भ.प. मंगेश महाराज वाघ व ह.भ.प. बाळासाहेब घुले महाराज यांनी सामाजिक भावनेने आई-वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी राहुरी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे, श्रीगोंदा तालुक्याचे राजेंद्र पोकळे, सुरेश गलांडे, बलभीम मोरे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयाच्या विशेष सहकार्याने हा शिबीर यशस्वी पार पडले. डॉ. सुमय्या खान, अमृत झांबरे, विशाल जाधव, स्नेहल सावंत, अशोक पवार, मोहन पोकळे, नरेश पेवाल आदींनी रक्तसंकलन केले. मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक डी.टी. पालवे, आरोग्य सेविका एच.एम. शेंडे व आशा सेविका आशा नवघरे यांनी नागरिकांचे कोरोना लसीकरण केले. डॉ. सुधाकर बडे व सतीश अहिरे यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी केली. यामधील पंधरा गरजू रुग्णांवर जिल्हा रुग्णालय येथे मोतिबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रक्तदात्यांचा शेळके कुटुंबियांच्या वतीने गौरव करण्यात आला. तसेच ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लस देखील देण्यात आली. आई-वडील अथांग मायेचा सागर असून, त्यांच्या संस्काराने भावीपिढी घडत असते. त्यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य असून, त्यांच्या प्रेरणेने हा उपक्रम घेतला असल्याचे बाबासाहेब शेळके, पोपट शेळके, दिलीप शेळके, हरिभाऊ शेळके, शिवाजी शेळके, सुभाष शेळके, मंगलताई पाटील, उषाताई जगदाळे, आशाताई शिंदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.