शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी केले गुरुपूजन
शिक्षण क्षेत्र समाजाचा वसा -माजी प्राचार्य खासेराव शितोळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्र समाजाचा वसा असून, स्वत:ला झोकून देऊन हे काम केल्याशिवाय समाजपुढे जाणार नाही. परंपरागत शिक्षण पध्दती धरुन ठेवल्यास भावी पिढी क्षमा करणार नाही. जग झपाट्याने बदलत असताना शिक्षकांनी देखील बदलत्या प्रवाहात अद्यावत शिक्षणाची कास धरावी, असे प्रतिपादन माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांनी केले.
गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक विद्यालयात आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात माजी प्राचार्य शितोळे बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सामाजिक कार्यकर्ते अजय लयचेट्टी, माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल, सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, खजिनदार जयंत रंगा, मुख्याध्यापक दिपक रामदिन, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे शितोळे म्हणाले की, शिक्षक हा ज्ञानाचा उपासक असावा, मिळवलेले ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असावा. प्रत्येक मुलाचे अंतकरणात ज्ञान दडलेले असते. त्यावर पडलेला पडदा हटविण्याचे काम शिक्षक करतात. आजच्या शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देणे आवश्यक असून, ते शिक्षण विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक दिपक रामदिन यांनी जीवनात शिक्षकांचे महत्त्व विशद करुन भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्याच्या नात्याला मोठे महत्त्व असल्याचे स्पष्ट केले. पाहुण्यांचा परिचय ग्रंथपाल विष्णु रंगा यांनी करुन दिला. यावेळी माजी प्राचार्य व आजी-माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी जीवनात शिस्त लावण्याचे काम शिक्षक करत असतात. शिस्तमुळे विद्यार्थी जीवनात यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर शाळेला जागा मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, गुरुशिवाय जीवन अशक्य आहे. गुरु हा दोन अक्षरांचा शब्द अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा दीपस्तंभ आहे.गुरु जीवनाला गती व दिशा देत असल्याचे त्यांनी सांगितले. तानाजी काळुंगे यांनी गुगलच्या युगात गुरुचे महत्व अबाधित असून, बदलत्या आव्हानांना शिक्षक सामोरे जात असल्याचे सांगितले. भव्यकुमारी राय व ऋतूजा आसने या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणात गुरुचे महत्त्व सांगितले. संस्थेचे विश्वस्त राजू म्याना व स्मिता म्याना यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप छिंदम यांनी केले. आभार प्रमोद चन्ना यांनी मानले. कल्पना गोसकी यांनी सत्काराची उदघोषणा केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश आनंदास, सुहास बोडखे, अजय न्यालपेल्ली, मथुरा आढाव यांच्यासह सर्व अध्यापक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
12 भारतरत्न व्यक्तीचित्राचा समावेश असलेल्या दालनाचा शुभारंभ
ज्येष्ठ कलाध्यपक नंदकुमार यन्नम यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतातील 12 भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींचे चित्र रेखाटले आहेत. या चित्र दालनाचा शुभारंभ उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.