अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच वर्षापुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीड जिल्ह्यात लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या व सध्या अहमदनगर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून बदली होऊन आलेल्या त्या भ्रष्ट अधिकारीची हकालपट्टी करुन त्याचे निलंबन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिले असून, शिक्षण संचालकांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब यमाजी धनवे यांनी बीड जिल्ह्यात गट शिक्षणाधिकारीपदी कार्यरत असताना बायोमेट्रीक मशीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा खोटा आरोप करुन फौजदारी गुन्हा दाखल न करण्यासाठी व निलंबन प्रस्ताव न पाठविण्यासाठी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात त्यांना 25 हजार लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साबलखेड गावालगत रंगेहाथ पकडण्यात आले. अशा भ्रष्ट कारभाराची पुनरावृत्ती अहमदनगर जिल्ह्यात होऊ नये, तसेच माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. अशा बेजबाबदार व भ्रष्ट अधिकार्यांना हटवून त्यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने पुढाकार घेतला आहे.
सुफी-संतांच्या व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन उभारणार्या जिल्ह्यातून अशा भ्रष्ट अधिकार्यांची हकालपट्टी करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर अधिकार्याला एक महिन्याच्या आत न हटविल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.