• Wed. Dec 11th, 2024

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या तज्ञ संचालकपदावरुन सत्ताधारी व विरोधी संचालकांमध्ये खडाजंगी

ByMirror

Jun 22, 2022

मासिक बैठक सुरु होण्यापूर्वीच गदारोळ

घटनेत तरतूद नसताना नियमबाह्य पध्दतीने तज्ञ संचालकपदी कचरे यांची नियुक्ती झाल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द होऊनही नियमबाह्य पध्दतीने तज्ञ संचालकपद मिळवणारे भाऊसाहेब कचरे यांना माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या मासिक बैठकीतून बाहेर काढण्यासाठी परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालकांची सत्ताधारी संचालकांबरोबर जोरदार खंडाजंगी झाली. नियमबाह्य पध्दतीने तज्ञ संचालकपद मिळवणारे व्यक्ती सभागृह बाहेर जात नाही, तो पर्यंत सभा चालू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा विरोधी संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे व वसंत खेडकर यांनी घेतला होता.


काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द होऊनही तज्ञ संचालक पद मिळवणार्‍या सत्ताधारी मंडळाचे प्रमुख भाऊसाहेब कचरे यांचे तज्ञ संचालकपद रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधी संचालकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर निदर्शने करुन निवेदन दिले होते. सोसायटीच्या घटनेत तरतूद नसताना सेवानिवृत्त झालेल्या सभासदाची तज्ञ संचालक पदी नियुक्ती करणे बेकायदेशीर असून, याबाबत जिल्हा उपनिबंधकाकडून कुठल्याही प्रकारे अभिप्राय न घेता परस्पर नियुक्ती केल्याचे विरोधी संचालकांचे म्हणने आहे. मासिक सभेत तज्ञ संचालक कचरे सभागृहात उपस्थित असल्याचे दिसताच विरोधी संचलकांचा पारा चांगलाच चढला होता. तज्ञ संचालकास सभागृहाबाहेर काढून बैठक सुरळीत सुरु करण्याचा आग्रह विरोधकांनी घेतला होता. मात्र सत्ताधारी यांनी देखील तज्ञ संचालकपदी केलेली नियुक्ती कशी योग्य आहे? याबाबत खुलास करण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक खंडाजंगी रंगली होती.

सोसायटीत चुकीचे करू देणार नाही, सेवानिवृत्त झालेल्या व सभासद नसलेल्या व्यक्तीने बैठकीतून बाहेर पडण्याचा अट्टाहास विरोधी संचालकांनी धरला होता. यावेळी तज्ञ संचालक निवडीबाबतची घटना वाचवून दाखविण्यात आली. कचरे यांच्या नियुक्तीबाबत सत्ताधार्‍यांनी सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कचरे यांना तज्ञ संचालक म्हणून कोणत्याही प्रकारे स्विकारले जाणार नसल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले. या बैठकित सभासदांच्या हितासाठी कर्ज मर्यादा दोन लाख रुपयांनी वाढविण्याच्या निर्णयाचे विरोधी संचालकांनी स्वागत करुन, यापुढे कोणत्याही बैठकीला तज्ञ संचालक म्हणून कचरे उपस्थित राहिल्यास त्यांना विरोध केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सत्ताधारी संचालक मंडळाचे नेते असलेले भाऊसाहेब कचरे सेवानिवृत्त झाले आहे. सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाचे सोसायटीचे सभासदत्व देखील रद्द होते. संस्थेचे उपविधीमध्ये सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था यामधील सेवक व अनुभवी व्यक्ती तसेच सनदी लेखापाल यांची तज्ञ संचालक म्हणून नेमणूक करण्याचे 97 व्या घटना दुरुस्ती मध्ये नमूद आहे. मात्र या नियमात कचरे बसत नसतांना देखील केवळ सोसायटीच्या कामात ढवळाढवळ व आर्थिक हित साधण्यासाठी त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच सेवानिवृत्त झालेला सभासद तज्ञ संचालक म्हणून गैरमार्गाने निवडण्यात आला. या प्रकरणी योग्य निर्णय न झाल्यास न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. – आप्पासाहेब शिंदे (विरोधी संचालक तथा परिवर्तन मंडळाचे नेते)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *