सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द झाले असल्याचे स्पष्टीकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द होऊनही तज्ञ संचालक पद मिळवणार्या सत्ताधारी मंडळाचे प्रमुख व्यक्तीचे तज्ञ संचालकपद रद्द करण्याच्या मागणीसाठी परिवर्तन मंडळ, विरोधी संचालक व सभासदांच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. पदाचा मोह सुटत नसल्याने काही संचालकांना हाताशी धरून संस्थेत भ्रष्टाचार करण्यासाठी पुन्हा पद मिळवले असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
चुकीच्या पध्दतीने तज्ञ संचालक पद मिळवणार्या व्यक्तीचे सभासदत्व रद्द होण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात सोसायटीचे विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद बद्रीनाथ शिंदे, बाळासाहेब निवडुंगे, संतोष ठाणगे, प्रसाद साठे, अर्जुन भुजबळ, अभय जावळे, दिलीप बोठे, राहुल झावरे, भाऊसाहेब जिवडे, नंदकुमार शितोळे, राजेंद्र कोतकर, शिरीष टेकाडे आदी सहभागी झाले होते.
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या मागील संचालक सभेमध्ये नुकतेच सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द झालेले भाऊसाहेब कचरे यांना तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. कचरे यांनी सत्ताधारी संचालक मंडळातील काही संचालकांना हाताशी धरून तज्ञ संचालक पद मिळवले आहे. सोसायटीच्या घटनेमध्ये ज्या दिवशी शिक्षक निवृत्त होतो, त्या दिवशी त्याचे सभासदत्व रद्द होत असल्याचे नियम आहे. मात्र कचरे यांचे सभासदत्व रद्द झाल्यानंतरही त्यांनी पदाच्या माध्यमातून अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्यासाठी तज्ञ संचालकपदी नियुक्ती करून घेतली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संस्थेचे उपविधीमध्ये सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था यामधील सेवक व अनुभवी व्यक्ती तसेच सनदी लेखापाल यांची नेमणूक करण्याचे 97 व्या घटना दुरुस्ती मध्ये नमूद आहे. संबंधित व्यक्ती सत्ताधारी मंडळाचे प्रमुख असल्यामुळे संस्थेच्या कारभारात हुकूमशाही पद्धतीने हस्तक्षेप करणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करून संस्थेचे व सभासदांचे हित लक्षात घेऊन कचरे यांची बेकायदेशीररीत्या तज्ञ संचालकपदी झालेली निवड रद्द करण्याची मागणी परिवर्तन मंडळ, विरोधी संचालक व सभासदांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा उपनिबंधक कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक टी.ए. थोरवे यांना देण्यात आले.