• Thu. Dec 12th, 2024

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची चौकशी व्हावी

ByMirror

Feb 15, 2022

अन्यथा परिवर्तन मंडळाचे सर्व विरोधी संचालक व सभासदांचे ठिय्या आंदोलन -बाबासाहेब बोडखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन वेळा निवेदन देऊन व पाठपुरावा करुन देखील अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची चौकशी होत नसल्याने, परिवर्तन मंडळाच्या वतीने विरोधी संचालकांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना स्मरणपत्र दिले. सन 2016 पासून संस्थेच्या सर्व शाखांचे ऑनलाइन प्रणालीच्या कामकाज अद्यापि अपुर्ण असून, दोन महिन्यापूर्वी पारनेर शाखेतील डाटा सेंटरच्या नावाखाली देण्यात आलेल्या ऑनलाइनच्या कामामुळे पूर्वी झालेले काम अपुर्णच असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद बबन शिंदे, जालिंदर शेळके उपस्थित होते.
30 मार्च, 30 नोव्हेंबर व 2 डिसेंबर 2021 रोजी परिवर्तन मंडळाच्या वतीने तीन वेळेस माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची चौकशी होण्याबाबत निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. दोन वेळेस जिल्हा उपनिबंधकांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणी सविस्तर माहिती दिली होती. परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही स्वरुपाची कारवाई करण्यात आलेली नाही. माध्यमिक शिक्षक सोसायटीत पुरोगामी मंडळाच्या सत्ताधारी संचालक मंडळाने 10 जून 2015 ते 10 जून 2016 या एका वर्षाच्या कालावधीत संस्थेच्या सर्व शाखांची ऑनलाइन प्रणालीचे कामकाज या संस्थेत मानधन तत्वावर काम करत असलेल्या एका कर्मचार्‍यास 18 लाख रुपयात पूर्ण करून देण्यासाठी 10 जून 2015 रोजी लिखित करारनामा केला होता. या व्यतिरिक्त डेडस्टॉक रजिस्टरच्या नोंदीनुसार 28 नोव्हेंबर 2017 ला ऑनलाइन प्रणालीसाठी मायक्रोसॉफ्ट लायसनसाठी एक 5 लाख 23 हजार 450 व पुन्हा 7 लाख 83 हजार 278 एकूण अशी 13 लाख 6 हजार 728 रुपयांचा खर्च करण्यात आला. त्या व्यतिरिक्त ऑनलाइनमुळे जुने संगणक संपूर्ण लोड सहन करणार नसल्याच्या कारणास्तव सर्व शाखांमध्ये नवीन संगणक घेण्यात आले. त्या कामापोटी फर्निचर, हाय पावर सर्व्हर इत्यादी खरेदी केले. या ऑनलाईन प्रणालीसाठी तब्बल सुमारे 55 ते 60 लाख रुपये खर्च केले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करुन सुध्दा संस्थेचे ऑनलाईनचे काम अपूर्ण असून, ही सभासदांची व संस्थेची फसवणूक आहे. आजतागायत 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत करारनाम्यानुसार जवळपास 80 टक्के काम अपूर्ण असताना पुरोगामी मंडळाच्या सत्ताधारी संचालकांनी ऑनलाइनचे काम पूर्ण झाले असल्याचे भासवून, संबंधित करार धारकास टप्प्याटप्प्याने सन 2019 च्या आत संपूर्ण रक्कम दिलेली आहे. या सत्ताधारी संचालक मंडळाने बहुमताने दोन महिन्यापूर्वी पारनेर शाखेत डाटा सेंटरच्या नावाखाली ऑनलाइनचे काम नवीन व्यक्तीला दिलेले आहे. पूर्वी दिलेल्या ऑनलाइन प्रणालीचे काम अपूर्णच असल्याचे हा स्पष्टपणे पुरावा असल्याचे विरोधी संचालकांचे म्हणणे आहे.रविवारी (दि.13 फेब्रुवारी) संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये संस्थेच्या डाटा सेंटर भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. हाच विषय सत्ताधारी संचालक मंडळाने यापूर्वी संचालक मंडळाच्या मासिक मिटिंग मध्ये व मागील सर्वसाधारण सभेत ठेवला होता. परंतु परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालक व सभासदांच्या विरोधामुळे त्यावेळी रद्द केला होता. परंतु आता पुन्हा नव्याने संचालक मंडळ डाटा सेंटरच्या नावाखाली संस्थेच्या सभासदांचे नुकसान करू पाहत असल्याचे म्हंटले आहे.

माध्यमिक शिक्षक सोसायटीत सत्ताधारी संचालक मंडळाने केलेल्या ऑनलाईन प्रणालीच्या काम अपूर्ण आहे. या कामांची निपक्षपातीपणे सखोल चौकशी होऊन, संस्थेला व सभासदांना न्याय द्यावा. अन्यथा परिवर्तन मंडळाचे सर्व विरोधी संचालक व सभासद आपल्या कार्यालयासमोर ठिय्या देऊन उपोषण करतील. -बाबासाहेब बोडखे (विरोधी संचालक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *