शिक्षक मतदार संघाप्रमाणे सैनिक मतदार संघ निर्माण करण्याची मागणी
जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, रक्षा मंत्री व केंद्रीय निवडणूक आयोगला निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात शिक्षक मतदार संघाप्रमाणे सात विभागांमध्ये सात सैनिक मतदार संघ निर्माण करुन ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, लोकसभा व राज्यसभेत प्रत्येकी एक जागा देऊन माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नुकतेच फाऊंडेशनच्या वतीने पंतप्रधान यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री, रक्षा मंत्री व केंद्रीय निवडणूक आयोग यांना निवेदन पाठविण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.
देशामध्ये सैनिकांना राजकीय आरक्षण मिळाल्यास मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो. देश सेवा केलेले माजी सैनिक देशाच्या विकासासाठी आपले योगदान देणार आहेत. आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात आणि केंद्रामध्ये सैनिक प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. सैनिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सैनिक देशाच्या सीमेवर रक्षण करत असताना सैनिकांच्या जमिनीवर अवैध कब्जा केला जातो. सैनिकांचे शेतीतील रस्ते बंद करुन त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही. राज्यामध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सात आमदार आहेत. मात्र आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आजी-माजी सैनिकांची व शहीद परिवारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यामध्ये सैनिक मतदार संघ निर्माण करून सात आमदार सैनिक व्हावे, माजी सैनिकांना ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत आरक्षण मिळण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगर व महाराष्ट्र राज्यातील सैनिक परिवाराच्या वतीने करण्यात आलेली आहे. या मागणीसाठी राज्यातील जवळपास 50 हून अधिक सैनिक संघटनांनी केंद्र सरकारची व राज्य सरकारची निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू केलेला असल्याचे पालवे यांनी सांगितले आहे.