देशाचे रक्षण करून आलेले सैनिक मायभूमीची वृक्षरोपणाने सेवा करत आहे -सुरेश वाबळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांचे जिल्ह्यातील गावा-गावात व डोंगर, टेकड्या, गड, मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान सुरु असून, या अभियानातंर्गत निंभेरे (ता. राहुरी) येथे विविध प्रकारच्या झाडे लावण्यात आली.
साईबाबा देवस्थान शिर्डीचे विश्वस्त सुरेश वाबळे यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन गावात झाडे लावण्याच्या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच डॉ. सुधाकर मुसमाडे, किशोर गागरे, प्रेरणा पतसंस्थेचे संचालक लक्ष्मण गागरे, सुनील गागरे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, शरद हरिश्चंद्रे, नानाभाऊ गागरे, अनिल गागरे, डॉ. उमेश मुसमाडे, डॉ. पन्हाळे, ज्ञानदेव गागरे, रमेश गागरे, मेजर ताराचंद गागरे आदी उपस्थित होते.
सुरेश वाबळे म्हणाले की, माजी सैनिकांनी जय हिंद फाउंडेशनद्वारे जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण व संवर्धनाची चालवलेली चळवळ प्रेरणादायी आहे. वृक्षरोपण काळाची गरज बनली असून, सर्वसामान्यांनी यामध्ये योगदान देण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात झाडे जगविल्यास निसर्गाला पुनर्रवैभव प्राप्त होणार आहे. देशाचे रक्षण करून आलेले सैनिक मायभूमीची वृक्षरोपणाने सेवा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी पालवे यांनी या पावसाळ्यात प्रत्येकाने एक झाड लाऊन ते जगविल्यास पर्यावरणाचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. वृक्षरोपणाने निसर्ग हिरवाईने फुलून माणसाचे जीवन सुखकर होणार आहे. मुलांप्रमाणे वृक्षावर प्रेम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. मेजर ताराचंद गागरे यांनी गावात फाऊंडेशनच्या माध्यमातून लावण्यात आलेली सर्व झाडे जगविण्यात येणार असल्याचा संकल्प केला. मेजर शिवाजी गर्जे यांनी आभार मानले.