चर्मकार विकास संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील वरुर येथे मागासवर्गीय तेलोरे कुटुंबीयांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या गावगुंडांना अटक होण्याच्या मागणीसाठी चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, सुभाष मराठे, सुभाष चिंधे, निलेश आंबेडकर, विनोद कांबळे, विकी कबाडे, अर्जुन कांबळे, संतोष कदम, संतोष कांबळे, भानुदास नन्नवरे, ज्ञानेश्वर पाखरे, दिलीप तावरे, अशोक बनसोडे, ज्ञानेश्वर वाघमारे, भिकाजी वाघ, कांतिलाल माने, सोमनाथ तेलोरे आदी उपस्थित होते.
शेवगाव तालुक्यातील वरुर येथे मोलमजुरी करणारे गोरख मारुती तेलोरे, मुलगा सोमनाथ तेलोरे व कुटुंबातील महिलांना गावातील गुंड प्रवृत्तीचे दादासाहेब जाधव व त्यांच्या साथीदारांनी अमानुषपणे मारहाण केली. यामध्ये तेलोरे कुटुंबीयांना चाकू, लोखंडी रॉडने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. घरातील महिलांना सुद्धा यामध्ये मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये जखमी झालेले गोरख तेलोरे यांच्यावर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून, डोक्यावर व छातीवर चाकूने वार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या जबर मारहाण मध्ये त्यांच्या डोळ्यांकडे जाणार्या रक्तवाहिन्या निकामी झाल्या असून, त्यांचा डोळा देखील निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी मोठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. छातीवर सुद्धा चाकूने मोठ्या जखमा करण्यात आल्या आहेत. या हल्ल्याने संपुर्ण तेलोरे कुटुंबीय भयभीत झाले असून, ते दबावाखाली आहे. या प्रकरणी 19 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप पर्यंत पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने यामधील गुंड प्रवृत्तीचे आरोपी फरार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणात पोलीस तेलोरे कुटुंबीयांना गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत असून, पोलीसांची भूमिका आरोपींना पाठीशी घालण्याची दिसत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. आरोपी गुंड प्रवृत्तीचे असल्याने ते तेलोरे कुटुंबीयांना गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. पिडीत कुटुंबियांवर आरोपीकडून पुन्हा हल्ला होण्याची भिती असून, आरोपींना तात्काळ अटक व्हावी व तेलोरे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना देखील पाठविण्यात आले आहे.