सदस्यत्व रद्द प्रकरणावर अखेर पडदा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हाभर गाजलेल्या आदर्शगाव मांजरसुंबा (ता. नगर) येथील सरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व अखेर नाशिक विभागीय आयुक्तांनी देखील कायम ठेवले आहे. जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी सदर सदस्यांचे सभासदत्व कायम ठेवण्याच्या दिलेल्या निर्णयावर पुन्हा शिक्कामोर्तब केल्याने या वादावर अखेर पडदा पडला आहे.
आदर्शगाव मांजरसुंबा (ता. नगर) ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले सरपंच मंगल कदम, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मच्छिंद्र कदम, किरण कदम, कविता वाघमारे, प्रशांत कदम, रुपाली कदम या सहा सदस्यांविरोधात निवडणुकीचा खर्च मुदतीत सादर न केल्याप्रकरणी त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा अर्ज रामनाथ गोविंद कदम व इतर तीन अर्जदारांनी निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे दि.30 मार्च 2021 रोजी दाखल केला होता.
ग्रामपंचायत सदस्यांकडून उमेदवारांना खर्च दाखल करण्यास झालेल्या उशीराची बाजू अॅड. संकेत नंदू बारस्कर यांनी जिल्हाधिकारी यांच्यापुढे लेखी मांडली. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर 1 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी यांनी सरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांचे सभासदत्व कायम ठेवण्याचा निकाल दिला होता. याविरोधात तक्रारदारांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. यावर देखील नुकतीच अंतिम सुनावणी होऊन ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा मिळाला आहे.
यावर अपीलार्थींचे अपील अमान्य करुन, 1 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी यांनी पारित केलेला आदेश कायम करण्याचे नाशिक अप्पर विभागीय आयुक्त भानुदास पालवे यांनी आदेश दिले आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या बाजूने अॅड. संकेत बारस्कर यांनी काम पाहिले.
अखेर सत्याचा विजय झाला असून, प्रमाणिकपणे निवडून आलेल्या सदस्यांचे सभासदत्व कायम राहिले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल लागल्याने सभासदांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शेवट पर्यंत या प्रकरणात सत्यता कायम राहिली. -अॅड. संकेत बारस्कर