मुलींच्या पंखात बळ निर्माण करण्यासाठी आईने तिच्या पाठीमागे धाडसाने उभे रहावे -भाग्यश्री बिले
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलींचे भविष्य घडविताना आर्थिक सक्षम नसल्याचा विचार मनातून काढून टाकावा. जिद्दीने सर्व काही शक्य होते. मुलींसाठी शासनाच्या विविध योजना असून, त्याचा लाभ घेतला पाहिजे. मुलींना भरारी घेण्यापासून थांबवू नका, तिच्या पंखात बळ निर्माण करण्यासाठी आईने मुलीच्या पाठीमागे धाडसाने उभे रहावे. महिला सर्वच क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करत असताना मुलांप्रमाणे मुलींना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रांती असंघटीत कामगार संघटना व दुर्गा मंचच्या वतीने महिला दिनानिमित्त वाडियापार्क क्रीडा संकुल येथे घरेलू मोलकरीण महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी बिले बोलत होते. या मेळाव्यात स्त्री शक्तीचा जागर करुन, मुलींना-मुलांप्रमाणे उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे, जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री भोसले, क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, क्रीडा अधिकारी दिपाली बोडके, महिला कॉन्स्टेबल वर्षा कदम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
पुढे जिल्हा क्रीडा अधिकारी बिले म्हणाल्या की, घरची परिस्थिती बिकट असताना कोणताही सराव न करता एका छोट्याशा गावातून जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धा पर्यंत मजल मारली. मनाने ठाम राहिल्यास समाजाकडून देखील मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तर एका छोट्याशा गावातील शेतकर्याची मुलगी ते आंतरराष्ट्रीय खेळाडू व जिल्हा क्रीडा अधिकारी हा स्वतःबद्दलचा प्रेरणादायी प्रवास उलगडला.
भाग्यश्री भोसले म्हणाल्या की, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून महिलेला महिलापण सांभाळावे लागते. नंतर इतर जबाबदार्या पार पाडाव्या लागतात. कर्तुत्वाने उभे राहताना स्वाभिमान व आत्मविश्वास वेगळ्या दिशेने घेऊन जातो. स्वतचे अस्तित्व निर्माण करा, कोणतेही काम छोटे-मोठे नसते. संसार सांभाळून मुलींना आपल्या पुढचं पाऊल टाकायला आपण प्रोत्साहित केले पाहिजे. स्वतःच्या अस्तित्वासाठी ठाम उभे राहणे हाच महिलादिनी संकल्प होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांनी महिलांच्या सुरक्षेवर बोलताना महिलांनी समाजात जागृक व निर्भयपणे वावरावे. त्यांच्या मदतीला पोलीस यंत्रणा नेहमी सज्ज असल्याचे स्पष्ट करुन, महिलांसाठी असलेल्या कायद्याची माहिती दिली. प्रास्ताविकात अनिता कोंडा यांनी समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या मोलकरीण महिलांसाठी महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. या महिलांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांच्या मुलांचे उज्वल भविष्य घडण्याच्या प्रमुख उद्देशाने हा मेळावा घेण्यात आल्याचे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व मोलकरीण महिलांचा सन्मान करण्यात आला. तर मुलगा पोलीस उपनिरीक्षक व एका मुलीला राष्ट्रीय खेळाडू घडविणार्या दोन महिला मोलकरीणींचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली बोडके यांनी केले. आभार अनिता कोंडा यांनी मानले.