कुस्ती खेळाचा वारसा पुढे चालविण्याच्या दृष्टीने कुस्ती खेळाडूंना पाठबळ देणार -पै. वैभव लांडगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी पै. वैभव विलास लांडगे यांची नियुक्तीझाल्याबद्दल त्यांचा नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगर तालुकाध्यक्ष पै. नाना डोंगरे, सचिव पै. बाळू भापकर, उपाध्यक्ष पै. संदीप डोंगरे, कोळपे आखाडा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पै. नानाभाऊ सोनवणे, निमगाव वाघाचे माजी सरपंच साहेबराव बोडखे, पारस सोनवणे, संग्राम सोनवणे आदी उपस्थित होते.
नगर तालुकाध्यक्ष पै. नाना डोंगरे म्हणाले की, जिल्ह्याला कुस्ती व पैलवानांचा मोठा वारसा असून, कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी पै. वैभव लांडगे यांचे नेहमीच योगदान राहिले आहे. जिल्हा तालिम संघाची अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे पेलवून त्यांनी बंद पडलेल्या विविध कुस्ती स्पर्धा घेतल्या. त्यांच्या या निवडीने कुस्ती क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पै. वैभव लांडगे यांनी जिल्ह्यातील कुस्ती खेळाचा वारसा पुढे चालविण्याच्या दृष्टीने कुस्ती खेळाडूंना पाठबळ दिले जाणार आहे. तसेच जिल्ह्यात विविध स्पर्धा घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.