अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांची मराठा समन्वय परिषदेच्या राज्याच्या मुख्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शारदा जाधव, राष्ट्रीय महासचिव सीए विजय कुमार शिंदे यांच्या कार्यसमितीने शिवमती अनिता काळे यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
अनिता काळे या जिल्हा परिषदेच्या शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात गत दोन दशकापेक्षा जास्त काळापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात जिजाऊ ब्रिगेडच्या बांधणीत काळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. महिलाशक्ती संघटित करण्याच्या कामात जिल्ह्यात काळे यांचा लौकिक असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर काम करण्याची संधी देण्यात आली असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील यांनी म्हंटले आहे.
मराठा समन्वय परिषदेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देऊन, महिला, युवक व युवतींच्या प्रश्नांसाठी विशेष कार्य करणार असल्याची भावना काळे यांनी व्यक्त केली. या नियुक्तीबद्दल मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, प्रयास ग्रुप व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्हा परिषद शिक्षकांनी काळे यांचे अभिनंदन केले आहे.