शाळेत फक्त एक तासासाठी थांबणार्या मुख्याध्यापक व मनमानी कारभार चालविणार्या कर्मचारींवर कारवाईची मागणी
शरद पवार विचार मंच व मानवता एक धर्म प्रतिष्ठांनचे निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल मध्ये पालकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत, शाळेत फक्त एक तासासाठी थांबणार्या मुख्याध्यापक व मनमानी पध्दती करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शरद पवार विचार मंच व मानवता एक धर्म प्रतिष्ठांनच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सत्यजित मच्छिंद्र यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद, अर्जुन बडेकर, सचिन पवार, मुजीर सय्यद, आयन सय्यद, चांगदेव कांबळे, नदीम सय्यद आदी उपस्थित होते.
सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल मध्ये मुलांच्या शाळेच्या प्रवेशासंदर्भात व इतर कामासाठी गेल्यावर मुख्याध्यापकांना भेटू दिले जात नाही. चार ते पाच वेळेस हेलपाटे मारल्यानंतर मुख्याध्यापक शाळेत फक्त एक तास थांबत असल्याचे कर्मचारींकडून सांगितले जाते. मुख्याध्यापकांच्या वेळेत भेटण्यासाठी गेल्यास कर्मचारी अत्यंत उध्दटपणे वागतात व अपमानास्पद वागणुक देतात. शाळेचे कर्मचारी व मुख्याध्यापक त्यांच्या वेळेनुसार मनमानी कारभार चालवत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
शाळेत प्रवेश व इतर कामासाठी आलेल्या पालकांना देखील अशीच वागणुक दिली जाते. मुले शाळेत असल्याने त्यांच्या विरोधात पालक बोलत नसून, अनेक पालकांना अपमानास्पद वागणूक देणे व मनमानी कारभार सुरु असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रश्नी संबंधीतांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शाळे विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.