• Wed. Dec 11th, 2024

भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी त्या गटविकास अधिकारीने केली शासकीय माहिती गहाळ

ByMirror

Apr 25, 2022

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने
त्या तत्कालीन गटविकास अधिकारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर(प्रतिनिधी)- भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी सन 2018 मध्ये केलेल्या कामाचे मासिक दैनंदिन्या सोबत पूरक तक्ता व दैनंदिनाच्या प्रति जिल्हा परिषदेत सादर न करता, सदरची शासकीय माहिती गहाळ केल्याप्रकरणी पारनेरच्या त्या तत्कालीन गटविकास अधिकारीवर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.
पारनेर तालुक्यातील तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करुन पंचायत समिती पारनेर अंतर्गत अनेक प्रकारच्या अपहाराबाबत जिल्हा परिषदेने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठविला आहे. तरी त्यांच्यावर अद्याप पर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. शौचालय, टँकर व बदली घोटाळा प्रकरणात अर्थपूर्ण संबंध ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणात अपहार केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे अधिकारी कोणत्या प्रकारे किती काम करतात, याचे नियंत्रण अधिकार्‍यांना अंदाज यावा या हेतूने अधिकारी यांनी मासिक दैनंदिनी सोबत आपल्या अधिनस्त आलेल्या शासकीय योजना बाबतची माहिती पूरकतक्त्यामध्ये जिल्हा परिषद यांना सादर करणे बंधनकारक आहे. असे असतानाही तत्कालीन पारनेर गटविकास अधिकारी यांनी आपला भ्रष्टाचार उघड होईल, यासाठी जाणीवपूर्वक सदरची माहिती गहाळ केली. ती माहिती जिल्हा परिषदेला आज पर्यंत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शासकीय माहिती गहाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *