अहमदनगर (प्रतिनिधी)- भीम लहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटना वकील आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. जावेद पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद वैरागर यांनी पठाण यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना नियुक्ती पत्र दिले.
भीम लहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटना संपूर्ण महाराष्ट्रात मागासवर्गीय, वंचित व दुर्बल घटकातील नागरिकाचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहे. वंचित व दुर्बल घटकांवर होणारा अन्याय, अत्याचाराचा बिमोड करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना योगदान देत आहे. अॅड. पठाण हे शेवगाव तालुक्यातील असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वकील आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे विनोद वैरागर यांनी सांगितले.
संघटनेच्या माध्यमातून अन्याय झालेल्या मागासवर्गीय व वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच कटिबध्द राहणार आहे. वंचितांसाठी न्यायालयीन लढा देवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, सर्वसामान्य जनतेला कायदा, कर्तव्य व अधिकाराची जाणीव करुन भयमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी कार्य केले जाणार असल्याचे अॅड. पठाण यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.