ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा उपक्रम
लहान मुलांमध्ये वृक्षरोपण चळवळीचे संस्कार रुजवले जात आहे -अनिता काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेकडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वृक्षरोपणाने प्राणवायूचा सोहळा साजरा होत आहे. या उपक्रमांतर्गत भिस्तबाग ढवण वस्ती येथील आदर्श शाळेचा गौरव मिळवलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.
शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका अनिता काळे व सहकारी शिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावली. ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचे रविंद्र चोभे, तेजस स्वामी, अहिल्या सांगळे, संगिता नजन, मिनाक्षी जाधव, ज्योती कदम, राणी मरकड आदींसह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
अनिता काळे म्हणाल्या की, पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनत असताना प्रत्येक नागरिकाने सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने वृक्षरोपण व संवर्धन या अभियानात योगदान देण्याची गरज आहे. पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या मुलांप्रमाणे झाडे लाऊन ती वाढविण्याची गरज आहे. शाळेत लहान मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजवून वृक्षरोपण चळवळीचे संस्कार रुजवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील शालेय परिसर हिरवाईने फुलविण्याचा संकल्पाने या अभियानात सहभाग नोंदवून लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली. तर विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या परिसरात लावण्यासाठी रोपे भेट देण्यात आली.