नगर वेल्थ गेम्स संग्राम चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत प्रथम व द्वितीय येण्याचा बहुमान
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाडिया पार्क क्रीडा संकुलात झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भिंगार येथील नवीन मराठी शाळेच्या खेळाडूंनी यश संपादन केले. नगर वेल्थ गेम्स संग्राम चषक अंतर्गत ही अॅथलेटिक्स स्पर्धा पार पडली. यामध्ये वैभवी खेडकर हिने प्रथम तर प्रणिता हिकरे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.
दोन्ही खेळाडूंचा शाळेत शाळा समितीचे सदस्य संजय सपकाळ व मुख्याध्यापिका उज्वला कळमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संजय सपकाळ यांनी नवीन मराठी शाळेचे विद्यार्थी शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबरच खेळातही आघाडीवर आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास घडविण्यासाठी त्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण केली जात आहे. यामुळे अनेक खेळाडू पुढे येताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी मुली शिक्षणाबरोबर खेळातही आपले कर्तृत्व गाजवत असल्याने त्यांचा अभिमान असल्याचे स्पष्ट करुन, दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सहकार्यवाह अॅड.गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, शाळा समितीचे चेअरमन नंदकुमार झंवर यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना रमेश वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मुसा सय्यद, दिपक कराळे, शरद कातोरे आदी शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.