• Wed. Dec 11th, 2024

भिंगार कॅन्टोन्मेंटच्या नागरी प्रश्‍नाबाबत खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवेदन

ByMirror

Apr 19, 2022

रक्षा मंत्रालय व केंद्र स्तरावर पाठपुरावा करून प्रश्‍न सोडविण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- रक्षा मंत्रालय व केंद्र स्तरावर पाठपुरावा करून भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांना भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी दिले. यावेळी अभिजीत सपकाळ, दिलीप ठोकळ, काशीनाथ साळुंके, अशोक पराते, सिध्दार्थ आढाव, विशाल बेलपवार, सर्वेश सपकाळ, राधेलाल नकवाल, अजिंक्य भिंगारदिवे, अमित खामकर आदी उपस्थित होते.
अहमदनगर शहराच्या दौर्‍यावर आलेल्या खासदार सुळे यांनी राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकारी संवाद मेळावा घेतला. यावेळी सपकाळ यांनी त्यांची भेट घेऊन भिंगारचे प्रश्‍न मांडले. भिंगारचे अनेक प्रश्‍न आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सोडविण्यात आलेले असून, वरिष्ठ स्तरावरील प्रश्‍न सोडविण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून ते सोडविण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शहरालगत असलेले भिंगार उपनगर उपेक्षित राहिले आहे. स्थानिक कारभार कॅन्टोन्मेंट स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केला जात असून, त्यावर रक्षा मंत्रालय भारत सरकारचे नियंत्रण असल्याने कॅन्टोन्मेंट मधील नागरिकांच्या समस्या बिकट बनत चालल्या आहेत. भिंगारची वाढती लोकसंख्या पाहता पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. या भागाला स्वतंत्र पाणी योजनेची गरज आहे. भिंगारला होणारा पाणीपुरवठा एमआयडीसी मार्फत एमईएसला व त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून नागरिकांना पाणी मिळते. सदर पाणीपुरवठा औद्योगिक दराने केला जातो. तो घरगुती पाणीपुरवठा दराच्या तीन ते चार पट अधिक आहे. अधिक पैसे भरुनही नागरिकांना आठ-आठ दिवस पाणी मिळत नाही. शेजारील बुर्‍हाणनगरची चाळीसगाव पाणी योजनेतून किंवा महापालिकेच्या फेज टू मधून भिंगारकरांना पाणी मिळाल्यास पाण्याचा प्रश्‍न सुटू शकणार आहे. भिंगारचा कायमचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन स्वतंत्र्य पाणी योजना मंजूर करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रक्षा मंत्रालय येथून सर्विस चार्ज फंड थकीत असून, निधी उपलब्ध होत नसल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. मागील काही महिन्यांपासून हा निधी मिळालेला नसल्याने भिंगारचे प्रश्‍न सुटलेले नाही. चटई क्षेत्र असल्याने भिंगार शहरातील नागरिक घरापासून वंचित आहे. नागरिकांना चटई क्षेत्राचे एफएसआय वन प्लस थ्री करण्याबाबतचे केंद्र सरकारकडे शिफारस करावी, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना कॅन्टोन्मेंट बोर्डाला लागू करण्यात याव्या, कॅन्टोन्मेंटच्या मोकळ्या जागेवर हडको गृहनिर्माण योजना राबवावी, कॅन्टोन्मेंट बोर्डाला स्वतंत्र नगरपालिकेचा दर्जा द्यावा, भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून लवकरात लवकर घोषित करुन त्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करावे, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे अडचणीच्या जागेत असून, त्याचे स्थलांतर करुन गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलीसांचे सख्यबळ वाढविण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *