पोलीसांचे संख्याबळ वाढवून, पोलीस स्टेशनचे प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी
अहमदनगर(प्रतिनिधी)- भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे मोठ्या जागेत स्थलांतर करुन, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांचे संख्याबळ वाढविण्याच्या मागणीचे निवेदन भिंगारच्या सर्व पक्षीय पदाधिकार्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या माध्यमातून नाशिक विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांना दिले.
पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नुकतीच नाशिक विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांच्या उपस्थितीमध्ये शांतता कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या पुढाकाराने सदर निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी भिंगारदिवे, वसंत राठोड, शामराव वाघस्कर, रविंद्र लालबोंद्रे, अभिजीत सपकाळ, महेश नामदे, सुनिल लालबोंद्रे, सुरेश तनपुरे आदी उपस्थित होते. सदर प्रश्नासंदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातूनही पाठपुरावा सुरु असून, हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे सपकाळ यांनी सांगितले.
भिंगार कॅम्प पोलीस ठाणे भिंगार शहरातील रस्त्याच्या मध्यभागी आहे. जागा कमी असल्याने दैनंदिन काम करण्यास पोलीस कर्मचार्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीन मोठी उपनगरे, दहा ग्रामपंचायती, लष्कराचे मुख्य तीन विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय व निवासस्थान तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्ग आणि धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा समावेश आहे. वास्तुस्थिती पाहिली असता पोलिसांचे अपुरे संख्याबळ असल्याने गुन्ह्यांचा शोध लागत नाही. गुन्हेगारी रोखण्यासाठी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला पोलीसांचे संख्याबळ वाढवावे व पोलीसांना व्यवस्थित काम करता येण्यासाठी पोलीस स्टेशनचे मोठ्या जागेत स्थलांतर करण्याची मागणी भिंगार शहरच्या सर्व पक्षीयांच्या वतीने करण्यात आली आहे.