अण्णाभाऊंनी कम्युनिस्ट विचारांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान दिले -कॉ. सुभाष लांडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांना लाल सलामच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. यावेळी भाकपचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे, भैरवनाथ वाकळे, कॉ. महेबुब सय्यद, रामदास वागस्कर, फिरोज शेख, दिपक शिरसाठ, सतिश निमसे, तुषार सोनवणे, आकाश साठे, सुनील ठाकरे, नितीन वेताळ, सनी आढाव, चंद्रकांत माळी आदी उपस्थित होते.
भाकपचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी कम्युनिस्ट विचारांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान दिले. कॉ अण्णाभाऊ हे लोकशाहीर व महान साहित्यिक तर होतेच पण ते गोरगरीब कष्टकर्यांच्या लढ्यातील बीनीचे शिलेदार होते. महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यात त्यांचे भरीव योगदान राहिले. त्यांनी आपल्या साहित्यातून क्रांती घडवून समाज जागृतीचे कार्य केले. दीन-दुबळ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी अखेर पर्यंत कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व स्वीकारले होते. अण्णाभाऊंना एका विशिष्ट जातीत बंदिस्त करता येणार नसून, ते सर्व श्रमिक, कष्टकर्यांचे नेते होते. आपल्या साहित्यातून परिवर्तनाचा दिलेला लढा प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.