• Wed. Dec 11th, 2024

भरकटलेल्या हेमंतला मानवसेवा प्रकल्पाने दाखवली कुटुंबाची वाट

ByMirror

Jul 19, 2022

भान हरवून शहरात आलेल्या छत्तीसगडच्या तरुणावर उपचार करुन केले कुटुंबात पुनर्वसन

मुसळधार पाऊसाला तोंड देत स्वयंसेवकांनी गाठले तरुणाचे घर

अहमदनगर (प्रतिनिधी)- मानसिक भान हरवल्यामुळे भरकटलेला तरुण हेमंत यादव हा काट्या-कुट्यांची खडतर वाटेने, रक्तबंबाळ झालेल्या पायांनी शहरात पोहचला. रस्त्यावरील आयुष्य जगतांंना त्याची दयनीय अवस्था झाली होती. अखेर हेमंतला मानवसेवा प्रकल्पात आधार मिळाला. या प्रकल्पात उपचार घेऊन मानसिक आरोग्य चांगले झाल्यानंतर या तरुणाचे त्याच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात आले.


मानसिक भान हरवल्यानंतर बिकट परिस्थितीमध्ये शहरात आलेल्या हेमंतला पोलीसांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रुग्णालयातील वरिष्ठ समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) सुरेश कदम यांनी सदर तरुणाला पुढील उपचार व पुनर्वसनासाठी 1 जुलै रोजी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पात दाखल केले. भरकटलेल्या या तरुणावर मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी उपचार केले. हेमंतला मानवसेवा प्रकल्पात प्राथमिक अन्न, वस्त्र, निवार्‍याची गरज भागवून त्याच्यावर उपचार करुन समुपदेशन करण्यात आले. उपचारा दरम्यान हेमंत यादव याने रायपूर, छत्तीसगड येथील असल्याचे सांगितले.


संस्थेचे स्वयंसेवक यांना हेमंत या तरुणाचे कुटुंब शोधण्यास यश मिळाले. बेफाम वारा आणि मुसळधार पाऊसाला तोंड देत मानवसेवा प्रकल्पाचे समन्वयक सोमनाथ बर्डे, राहुल साबळे, सुरेखा केदार यांनी रेल्वे पोलीसांच्या मदतीने आणि जिल्हा रुग्णालय येथील वरिष्ठ समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाने तर मोहीत पंजाबी यांच्या आर्थिक सहाय्याने हेमंतचे घर गाठले. अनेक महिन्यानंतर घरी परतलेल्या हेमंतच्या नातेवाईकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. हेमंतचे त्याच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक राहुल साबळे, सोमनाथ बर्डे, स्वप्नील मधे, प्रियंका गायकवाड, प्रतिक्षा ढाकणे, गौरी पोपेरे, कुणाल बर्डे, अंबादास गुंजाळ, सिराज शेख यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *