महिनाभर युवकांना दिले जाणार सौर ऊर्जेचे अद्यावत ज्ञान
अहमदनगर (प्रतिनिधी)- बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज, स्थित एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी), भारतीय विकास ट्रस्ट (बीव्हीटी) व मंडळ मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी एका महिन्याची निशुल्क हरित कौशल्य विकास (जीएसडीपी) कार्यशाळेच्या उद्घाटन डॉ. सुरेश पठारे यांच्या हस्ते झाले. यावेळी बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज दिअॅब्रिओ, जॉय डॅनियल, टेरीचे विजय विक्रमसिंह परीहार, संदीप कामत, सरपंच मंज्याबापू घोरपडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात झालेल्या कार्यक्रमात सौर प्रकल्पावरील विद्युत बल्ब प्रज्वलीत करुन अनोख्या पध्दतीने कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात फादर जॉर्ज दिअॅब्रिओ म्हणाले की, बॉस्को ग्रामीण विकास केंद्र सामाजिक परिवर्तन घडवून युवकांना दिशा देण्याचे कार्य करत आहे. हरित विकास कौशल्य कार्यक्रम राज्यात पहिल्यांदाच घेण्याचा बहुमान बास्को ग्रामीण विकास संस्थेला मिळाला. पारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत संपुष्टात येत असताना, भविष्यात हरित ऊर्जेशिवाय पर्याय नाही. यासाठी युवकांना सोलर प्रकल्पाचे अद्यावत प्रशिक्षण मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याद्वारे युवकांमध्ये कौशल्य विकसीत करून त्यांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुरेश पठारे म्हणाले की, भविष्यातील शाश्वत विकास हरित ऊर्जेवर अवलंबून राहणार आहे. सजीव सृष्टीही परमेश्वराने दिलेली देणगी असून, प्रदूषण मुक्त व सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी प्रत्येक युवकाने योगदान देण्याची गरज आहे. यासाठी युवकांनी हे कौशल्य आत्मसात करून हरित ऊर्जेचे दूत म्हणून समाजात कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी उपयुक्त असलेल्या या कार्यशाळेचे कौतुक केले. विजय विक्रमसिंह परीहार यांनी सौर ऊर्जेचे तंत्रज्ञान व कौशल्य युवकांना भविष्यात उपयुक्त ठरणारे आहे. पर्यावरण संरक्षण व मनुष्याचा उज्वल भवितव्यासाठी हरित ऊर्जेशिवाय पर्याय नाही. धरतीच्या सुरक्षिततेच्या या लढ्यात सहभागी होऊन युवकांनी योगदान देण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक भारत विकास ट्रस्टचे मनोहर काटेगिरी व सुमित भट्ट यांनी सौरऊर्जेवरील तांत्रिक व त्याची उभारणी याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिटर पाटोळे यांनी केले. आभार जॉय डॅनियल यांनी मानले. ही कार्यशाळा एका महिन्यासाठी निवासी असून, केडगाव, नगर-पुणे महामार्गावरील बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात प्रशिक्षणार्थी युवकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे.