फिनिक्स सोशल फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्री निमित्त भिंगार जवळील बेलेश्वर मंदिरात फिनिक्स सोशल फाऊंडेशन व अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात दर्शनास आलेल्या भाविकांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवून नेत्रदान व अवयवदानाचे संकल्प अर्ज भरुन दिले.
महाशिवरात्री निमित्त बेलेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. यावेळी भाविकांनी मरणोत्तर नेत्रदानाची गरज व महत्त्व सांगण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे, विक्रम गोहेर, सचिन तेजी, आकांक्षा गुरनानी, पी.बी. नन्नवरे, नगरसेवक योगीराज गाडे, राजेंद्र बोरुडे, वैभव दानवे आदींसह चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, धार्मिकतेला सामाजिकतेची जोड दिल्यास परिवर्तन घडणार आहे. मरणोत्तर नेत्रदान काळाची गरज बनली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. भारतीय समाजात नेत्रदान व अवयवदानबद्दल गैरसमजुती व अंधश्रध्दा असून, त्या जनजागृतीने दूर होणार आहे. आज देशात अनेक अंध व्यक्ती डोळ्यासाठी प्रतिक्षेत आहे. डोळे कृत्रिमरित्या तयार होत नसून, मरणोत्तर नेत्रदान झाल्यानेच अंधाचे जीवन प्रकाशमान होणार असल्याचे सांगून त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचे भाविकांना त्यांनी आवाहन केले.
नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे यांनी शरीर हे नष्वर असून, मरताना नेत्रदान करुन अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणार आहे. फिनिक्स सोशल फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालय नेत्र विभागाच्या माध्यमातून नेत्रदान जास्तीत जास्त होण्यासाठी जनजागृती मोहिम राबवली जात आहे. नेत्रदान व अवयवदान चळवळ ही काळाची गरज असून, मृत्यूनंतरही अवयवदानाने इतरांची गरज भागवून अवयवरुपाने जिवंत राहता येत असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्रदानाच्या अहवानाला प्रतिसाद देत यावेळी अनेक भाविकांनी नेत्रदान व अवयव दानाचे संकल्प केले.