बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व आनंदी वातावरण आवश्यक -न्यायाधीश रेवती देशपांडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- बालकांच्या न्याय, हक्कासाठी जिल्ह्यात उत्तमपणे कार्य सुरु आहे. बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व आनंदी वातावरण आवश्यक आहे. या उद्देशाने बाल कल्याण समिती कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. अशा अद्यावत कार्यालयाची जिल्ह्याला गरज होती. या कार्यालयाच्या माध्यमातून अधिक उत्साहाने बालकांची काळजी व संरक्षणाचे कार्य केले जाणार आहे. आनंदी वातावरणात बालकांचे प्रकरण हाताळता येणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या सचिव तथा न्यायाधीश रेवती देशपांडे यांनी केले.
इंटरनॅशनल जस्टीस मिशन, मुंबई (आय.जी.एम.) व जिल्हा महिला व बालविकास विभाग यांच्या माध्यमातून शहरातील निरीक्षण व बालगृह (रिमांड होम) येथे नूतनीकरण करण्यात अद्यावत बाल कल्याण समितीच्या कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी देशपांडे बोलत होत्या. यावेळी बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा तथा न्यायाधीश स्वाती जवळगीकर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी बी.बी. वारुडकर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, इंटरनॅशनल जस्टीस मिशनचे संचालक येशूदास नायडू, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, आय.जी.एम. चे पार्टनर ऑफीसर क्लेपा पारमार, कार्यक्रम समन्वयक विशाल घुले, बाल कल्याण समितीचे सदस्य अॅड. बागेश्री झरेंडीकर, प्रविण मुत्त्याल आदी उपस्थित होते.
जिल्हा महिला बालविकास अधिकारी बी.बी. वारुडकर म्हणाले की, बाल कल्याण समितीचे कार्यालय अद्यावत करुन बालकांना सुरक्षित व आनंदी वातावरण निर्माण करण्यात आले आहे. हे कार्यालय उभे करण्यामागचा उद्देश सफल झाला पाहिजे. यासाठी प्रत्येकाची जबाबदारी देखील वाढली आहे. वंचित घटकातील बालकांना न्याय, हक्क मिळवून देण्याचा सामाजिक विडा सर्वांनी उचललेला आहे. या विचाराने रंगलेल्या गांजलेल्या घटकांसाठी अविरत कार्य सुरू ठेवून, सक्षम पिढी घडविण्याचे कार्य करण्याचे त्यांनी सांगितले.
बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख म्हणाले की, मागील सहा ते सात वर्षापूर्वी बाल कल्याण समितीचे उत्तम पध्दतीचे कार्यालय नव्हते. बालकांच्या हक्कासाठी काम करताना अद्यावत कार्यालयची गरज भासत होती. ती पुर्ण झाली आहे. समितीच्या माध्यमातून बालकांच्या हक्कासाठी कामे करण्यात आली. त्यामध्ये विशेषत: बालसंगोपनाची कार्य करण्यात आली. संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना संस्थेत ठेऊन, चार वर्षात मोठ्या जबाबदारीने बालकांना संरक्षण दिल्याचे समाधान मिळत आहे. कोरोनाने मातृ-पितृ छत्र हरपलेल्या बालकांसाठी विशेष मोहिम म्हणून गावागावातील वाडी-वस्तीवर जाऊन समितीच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत बालसंगोपनाची योजना पोहचविण्यात आली. टाळेबंदी काळात महाराष्ट्रात सर्वाधिक बालविवाह अहमदनगर जिल्ह्यात थांबवण्यात यश आले. हे काम शासनापर्यंत जाणे अपेक्षित आहे. शेवटच्या घटकापर्यंत बालकल्याण समितीचे कार्य सुरु असून, बालकल्याण समितीचे खरे कार्य राज्याला दाखवून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रीयण पारंपारिक वेशभुषेत आलेल्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता नागरगोजे यांनी केले. आभार विशाल घुले यांनी मानले.
अद्यावत बाल कल्याण समिती कार्यालयात अद्यावत समुपदेश कक्ष, केस चालविण्यासाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, टोकन पध्दत, मुलांना खेळाण्यासाठी जागा, तसेच संगणक, वेब कॅमेरा आदी सोयी-सुविधांनीयुक्त तर बालकांना आनंदी वातावरण निर्माण करुन या कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे.