श्रमिकनगरच्या श्री मार्कंडेय विद्यालयात विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांनी वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, जल शुध्दीकरण, पाणी बचत, सौर ऊर्जेचा वापर तर विविध गणितीय सुत्रांचे प्रकल्प सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. तर प्रदर्शनात सहभागी बालवैज्ञानिकांनी आपल्या कल्पनाशक्ती व कौशल्याची चुणूक दाखवली.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्रीराम थोरात यांच्या हस्ते झाले. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी विज्ञान तज्ञ तथा डेक्कन इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. दत्ता पोंदे, विषय तज्ञ अरुण पालवे, विद्यालयाचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे, विज्ञान शिक्षिका मिनाक्षी बिंगेवार आदींसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शाळेचे अंगण जीवशास्त्र, भौतिकशास्त्र विषयाच्या रांगोळ्यांनी सजले होते. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात स्वत: तयार केलेले विज्ञान उपकरण मांडले होते. काही विद्यार्थ्यांनी विज्ञान व गणिताचे विविध भिंती पत्रके बनवून प्रदर्शनात सादर केले.
प्रशासन अधिकारी श्रीराम थोरात म्हणाले की, विज्ञानाची कास धरून यशस्वी जीवनाची वाटचाल करता येणार आहे. स्पर्धामय युगात विज्ञानाने क्रांतिकारक बदल घडत आहे. विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक होण्याचा संकल्प करण्याचे त्यांनी आवाहन केले. बाळकृष्ण सिद्दम यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचा सल्ला दिला. प्रास्ताविकात मुख्याध्यापक गोरे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. आभार मिनाक्षी बिंगेवार यांनी मानले.