हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणला
तिरंगा रॅलीत मौलवी व मदरसेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसेवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा ध्वज फडकवून मोठ्या उत्साहात परिसरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. हिंदुस्तान जिंदाबाद!…., सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा!… या घोषणांनी मदरसाचा परिसर दणाणला. या रॅलीत मौलवी व मदरसेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी मदरसेचे विश्वस्त कारी अब्दुल कादिर, अब्दुस सलाम, मन्सूर शेख, आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य नदीम शेख, निदेशक उजेफा शेख, गुलाम हाजीसहाब चमडेवाले, मौलाना अन्वर शेख, मौलाना अब्दुल करीम, मौलाना हंजला, मौलाना अब्दुल हमीद, मौलाना निसार पटेल आदी उपस्थित होते.
मदरसातील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगे ध्वज घेऊन जोरदार घोषणा दिल्या. बाराबाभळी परिसरातून निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. या उपक्रमात मौलाना अबुल कलाम आझाद आयटीआयचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
अब्दुस सलाम म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा सर्व भारतीय नागरिकांसाठी उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव सत्ताधार्यांच्या सांगण्यावरून नव्हे, तर सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून साजरा करण्यात आला आहे. ज्या प्रमाणे स्वातंत्र्य लढ्यात सर्व धर्मिय, जाती, पंथानी योगदान दिले, त्याप्रमाणे या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सर्व सहभागी होत आहे. देशभक्ती प्रदर्शनातून नव्हे, तर मनातून दिसण्याची गरज आहे. देशात संविधानानुसार काम करणार्यांबरोबर सर्व समाज असल्याचे त्यांनी सांगितले.
कारी अब्दुल कादिर यांनी मदरसेत धार्मिक शिक्षण, शालेय शिक्षणासह व देशप्रेम देखील रुजवले जात आहे. मदरसेत सुख, शांती व भाईचारेचा संदेश दिला जात असल्याचे स्पष्ट करुन, स्वातंत्र्य लढ्यात अनेक उल्मांनी योगदान दिले. ते मदरसेतून घडले होते, असे त्यांनी सांगितले.