तहसीलदार उमेश पाटील यांचा वीर पित्याच्या हस्ते सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासनाच्या अमृत जवान सन्मान अभियानातंर्गत नगर तालुक्यातील वीर माता-पिता, वीर पत्नी तसेच माजी सैनिकांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी प्रहार करिअर अकॅडमी येथे माजी सैनिकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी नगर तालुक्यातील माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल तहसीलदार उमेश पाटील यांचा प्रहार सैनिक कल्याण संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
माजी सैनिकांच्या मेळाव्यात वीर पिता मेजर शेख अब्बास यांच्या हस्ते तहसीलदार पाटील यांचा सत्कार झाला. यावेळी प्रहार सैनिक कल्याण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मेजर विनोदसिंग परदेशी, त्रिदलचे मेजर नारायण, मेजर भवानीप्रसाद, प्रहार सैनिक कल्याण संघाच्या महिला अध्यक्ष पुष्पा ताई मुंडे, जहीर पठाण, जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव देवकुळे, बाळासाहेब शेवाळे, मालोजी शिकारे, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू येवले, अॅड. संजय शिरसाठ आदी उपस्थित होते.
तहसिलदार पाटील यांनी शहीद जवानांचे कुटुंबीयांचे व माजी सैनिकांचे प्रलंबीत प्रश्न, शहीद जवान झाल्यानंतर राज्य शासनच्या माध्यमातून जमीन मिळवून देणे, शेतीच्या अडचणी, शहीद जवानांच्या पाल्यांना नोकरी, वीरपत्नी यांना शासकीय नोकरीत समावेश करणे, शेतातले बंद केलेले रस्ते खुले करणे आदी प्रश्नांचे निवारण करण्यासाठी रात्री नऊ वाजेपर्यंत प्रश्न घेऊन येणार्या सैनिक कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली.
मेजर विनोदसिंग परदेशी यांनी सर्व माजी सैनिक एकजुटीने एकत्र आल्यास शासनस्तरावर व्यवस्थित प्रश्न मांडून त्याची सोडवणुक करता येणार आहे. आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सुटण्यासाठी माजी सैनिकांसाठी कार्य करणार्या सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले. तर महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिकांच्या संघटनांना एकत्र करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. अमृत जवान सन्मान अभियानाच्या माध्यमातून वीर माता-पिता, वीर पत्नी व आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे माजी सैनिक संघटना व प्रहार सैनिक कल्याण संघाच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.