• Wed. Dec 11th, 2024

प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपने दिला महिलांना निरोगी व आनंदी जीवनाचा कानमंत्र

ByMirror

Jul 5, 2022

उत्तम आरोग्यासाठी तणावमुक्त जीवन आवश्यक -स्वाती गुंदेचा

व्याख्यानाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्यावर आधारलेले असून, शारीरिक स्वास्थ्यासाठी मानसिक आरोग्य उत्तम राहणे अपेक्षित आहे. मन व विचार चांगले ठेवल्यास आनंदी जीवनाचा अनुभव मिळत असतो. उत्तम आरोग्यासाठी तणावमुक्त जीवन आवश्यक असून, शारीरिक आरोग्यासाठी योग, व्यायाम तर मानसिक आरोग्यासाठी ध्यान करण्याचे स्वाती गुंदेचा यांनी सांगितले.


प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी निरोगी, सुखी व आनंदी जीवनाची वाटचाल या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. कौटुंबिक जीवनात व्यस असलेल्या महिलांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मार्गदर्शन करताना गुंदेचा बोलत होत्या. याप्रसंगी निसर्गोपचार तज्ञ हेमा सेलोत, उज्वला बोगावत, प्रयासच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षा सविता गांधी, अनिता काळे, नम्रता दादी-नानीच्या उपाध्यक्षा शोभा पोखर्णा, स्वप्ना शिंगी, शशीकला झरेकर, सुजाता पुजारी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पुढे बोलताना गुंदेचा म्हणाल्या की, महिला आनंदी राहिल्यास कुटुंबाचे वातावरण देखील आनंदी राहते. आनंदी राहण्यासाठी स्वीकारभाव महत्त्वाचा आहे. निर्माण झालेल्या प्रत्येक परिस्थितीचा स्विकार करता आला पाहिजे. विचारमुक्त जीवन आनंदी बनवते. नकारात्मक विचार सकारात्मकमध्ये बदलल्यास जीवनात मोठा बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर जगणं खूप झाले, जगता आले पाहिजे… ही कविता सादर केली.


निसर्गोपचार तज्ञ हेमा सेलोत म्हणाल्या की, योग्य आहारावरच आरोग्य आधारलेले असते. यासाठी प्रत्येकाने आपला आहार उत्तम ठेवण्याची गरज आहे. दैनंदिन आहार पध्दतीत बदल होत असल्याने मनुष्याच्या जीवनाता आजारांच्या व्याधी वाढल्या आहेत. मनुष्याच्या शरीरास हिरव्या पाणांचा रस, सर्व फळ, भाज्या आवश्यक असून, लहान मोठ्या आजारांसाठी आयुर्वेद हे सर्वोत्तम पर्याय आहे. जेवण चांगल्या पद्धतीने चावून तर द्रव्य पदार्थ सावकाश पिण्याचा आणि प्रत्येक ऋतूमधील फळ, पाले भाज्या यांचा आहारात समावेश करण्याचे त्यांनी सांगितले. मनाविरुद्ध घडल्यास निराश न होता, त्याचा स्वीकार करण्याचा आनंदी जीवनासाठी त्यांनी सल्ला दिला.


या व्याख्यानास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी ग्रुपच्या वतीने महिलांचे आरोग्य व त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी महिलांसाठी बौध्दिक व मनोरंजनात्मक खेळाची स्पर्धा पार पडली. विजेत्या महिलांना उज्वला भोगावत यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना शिंगी यांनी केले. आभार सुजाता पुजारी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *