बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी सूत्रधार व दलालांचा शोध घेतल्यास या प्रकारास पायबंद होणार -अॅड. पोकळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून लाभ घेणार्या टोळीतील आरोपीला अटक करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, पोपट शेळके, शहराध्यक्ष विजय हजारे, संघटक राजेंद्र पोकळे आदी उपस्थित होते.
आरोपींनी दिव्यांगांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून, या प्रमाणपत्राच्या आधारे एसटी बस प्रवासामध्ये सवलत मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांची ही बनावटगिरी उघडकीस आली. समाज कल्याणच्या वतीने कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील आरोपी फरार होते. त्याच्यातील आरोपीला पकडण्यात यश आले असून, यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अॅड. लक्ष्मण पोकळे म्हणाले की, दिव्यांगांचे बनावट प्रमाणपत्र प्रकरणात जिल्ह्यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, पकडलेल्या आरोपींकडून याचा उलगडा होणार आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे बनावट प्रमाणपत्र तयार करुन दिव्यांगांचे लाभ घेणार्यांवर वचक निर्माण झाला आहे. यामधील सूत्रधार व दलालांचा शोध घेतल्यास या प्रकारास पायबंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.